मराठी कथा, पटकथा आणि रंगमंचाचा जादूगर - कपिल भोपटकर
मुंबई, 12 नोव्हेंबर, (हिं.स.)। मराठी रंगभूमी व टेलिव्हिजन जगतात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे लेखक-दिग्दर्शक कपिल भोपटकर आता त्यांच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ''असंभव'' हा चित्रपटामुळे चर्चेत आहेत. मराठी रंगभूमी आणि टेलिव्हिजन क्षेत्रात गेली ती
मराठी कथा, पटकथा आणि रंगमंचाचा जादूगर - कपिल भोपटकर


मुंबई, 12 नोव्हेंबर, (हिं.स.)। मराठी रंगभूमी व टेलिव्हिजन जगतात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे लेखक-दिग्दर्शक कपिल भोपटकर आता त्यांच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'असंभव' हा चित्रपटामुळे चर्चेत आहेत. मराठी रंगभूमी आणि टेलिव्हिजन क्षेत्रात गेली तीन दशके आपल्या लेखणीतून आणि कल्पनाशक्तीतून त्यांनी एक वेगळा ठसा उमटवला आहे.

१९९०च्या दशकात पोद्दार कॉलेजमध्ये विद्यार्थी असताना त्यांनी सात एकांकिका लिहिल्या, ज्यांनी आंतरकॉलेज स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार जिंकले. त्यांची पहिली एकांकिका 'जल्लोष' आता 'झेप' या पटकथेत रूपांतरित होत असून लवकरच ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कपिल यांचा व्यावसायिक प्रवास प्रसिद्ध पटकथाकार सब्यसाची देब बर्मन यांच्या 'शांती' या मालिकेसाठी सहाय्यक संवाद लेखक म्हणून सुरु झाला. १९९८ मध्ये कपिल त्यांनी विश्राम बेडेकर यांच्या साहित्याचा मानदंड ठरलेल्या 'रणांगण' या प्रसिद्ध मराठी कादंबरीचं रंगमंचीय रूपांतर केलं आणि पुढे या नाटकाने अनेक प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले. रिचर्ड बाक यांच्या ‘जोनाथन लिविंगस्टोन सिगल' या पुस्तकाचं मराठी नाट्य रूपांतर दिग्दर्शित केलं आणि १९९९ मध्ये मानाची 'सवाई ट्रॉफी' जिंकली. या प्रयोगातून प्रियदर्शन जाधव, जितेंद्र जोशी, मधुरा वेलणकर आणि सिद्धार्थ जाधव यांसारख्या आजच्या लोकप्रिय कलाकारांचा प्रवास सुरु झाला.

टेलिव्हिजन विश्वात त्यांनी 'सनसनी' या मानसशास्त्रीय थ्रिलर मालिकेपासून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. अल्फा मराठीवरील ‘आक्रीत’ मालिका, त्यात संदीप कुलकर्णी, सयाजी शिंदे, अतिषा नाईक अशा मातब्बर कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या, त्या मालिकेचे लेखन केले, ज्याला नामांकन मिळाले होते. त्यानंतर श्रावणसरी, कगार आणि थरार अशा मालिकांमधून लेखन आणि पटकथेत नवे प्रयोग केले. विशेष म्हणजे त्यांनी दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या 'माझा खेळ मांडू दे' या नाटकाचं पटकथेत रूपांतर करून 'रैन बसेरा' ही टेलिफिल्म लिहिली, ज्यात किरण खेर मुख्य भूमिकेत झळकल्या. तर २०२५ मध्ये झी फायवर प्रदर्शित झालेली मराठीतील पहिली वेबसीरिज ‘अंधारमाया’ याची पटकथाही कपिल यांनी लिहिली आहे.

कपिल भोपटकर यांच्या लेखनातून वास्तव, भावना आणि मानवी नात्यांचं सूक्ष्म चित्रण नेहमीच जाणवते. ते केवळ लेखक किंवा दिग्दर्शक नाहीत तर कथा सांगण्यात, पात्रांना जीवंत करण्यात आणि प्रत्येक फ्रेममध्ये भावनिक गुंतवणूक निर्माण करण्यात पारंगत आहेत. त्यांच्या हातून आलेली प्रत्येक कथा, पटकथा प्रेक्षकांना फक्त मनोरंजन नाही तर एक अनुभव देणारी असते.

'असंभव' या चित्रपटाची कथा, पटकथा कपिल भोपटकर यांनी लिहिली असून येत्या २१ नोव्हेंबर रोजी 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया' मध्ये प्रदर्शित होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande