
सोलापूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.) खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणून आयर्नमॅन या स्पर्धेची क्रीडाविश्वात ख्याती आहे. उपळाई बुद्रूकचे सुपुत्र तथा आयकर अधिकारी स्वप्नील पाटील यांनी यशस्वीपणे पूर्ण करत अधिकृतपणे ''आयर्नमॅनचा'' किताब पटकावला आहे.
गोवा येथे ९ ऑक्टोबर रोजी आयर्नमॅन ७०.३ आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाली. यामध्ये स्वप्नील पाटील यांनी ही स्पर्धा ७ तास ५४ मिनिटांत पूर्ण केली. त्यात ११३ किलोमीटरमध्ये ९० किलोमीटर सायकलिंग, २१ किलोमीटर पळणे व दोन किलोमीटर पोहणे असा समावेश होता. या स्पर्धेत विविध देशांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.कठोर प्रशिक्षण, शिस्तबद्ध जीवन आणि अविश्रांत प्रयत्न यांच्या जोरावर स्वप्नील पाटील यांनी ही कठीणतम परीक्षा यशस्वीपणे पार करत खऱ्या अर्थाने आयर्नमॅन असल्याचं सिद्ध केले आहे. या स्पर्धेसाठी त्यांना पत्नी प्रियांका देशमुख, मित्र मंगेश चव्हाण, गणेश राख, नवनाथ अग्रवाल, रोहित देवा-झा यांचे पाठबळ मिळाले आहे. नोकरी सांभाळत त्यांनी या स्पर्धेसाठी तयारी करत. वेळेत ही स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड