
अमरावती, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्य सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत पारंपरिक अंगणवाड्यांचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील निवडक अंगणवाड्यांचे रूपांतर ‘आदर्श’ आणि ‘स्मार्ट अंगणवाडी केंद्रां’मध्ये करण्यात येणार असून, प्रत्येक केंद्राला ‘स्मार्ट अंगणवाडी किट’ देण्यात येणार आहे. या माध्यमातून बालकांचा सर्वांगीण विकास आणि महिलांच्या कौशल्यविकासाला चालना मिळणार आहे.
शिक्षण आणि सक्षमीकरणाचा दुहेरी उद्देश अंगणवाड्यांमधील शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, मुलांचा सहभाग वाढवणे आणि मातांच्या सक्षमीकरणाची प्रक्रिया अधिक प्रभावी बनविणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही अंगणवाड्या ‘स्मार्ट किट’च्या माध्यमातून डिजिटल शिक्षणाशी जोडल्या जाणार असून, या केंद्रांमध्ये शिक्षण, खेळ, पोषण आणि आरोग्यविषयक सुविधा अधिक सुसज्ज केल्या जातील. काय असेल ‘स्मार्ट किट’मध्ये? ‘स्मार्ट अंगणवाडी किट’मध्ये टीव्ही किंवा डिजिटल स्क्रीन, प्रोजेक्टर व ऑडिओ सिस्टीम, स्मार्ट शिक्षण सॉफ्टवेअर व अॅप, रंगीत खेळणी, शिक्षण फलक, चित्रकथांची पुस्तके, प्लास्टिक मॅट, फर्स्ट एड किट आणि स्वच्छता साहित्याचा समावेश असेल. प्रत्येक किटची किंमत अंदाजे ६० ते ७० हजार रुपयांदरम्यान असून, निधी महिला व बाल विकास विभागाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे.
महिलांसाठी कौशल्यविकासाच्या संधी
या अंगणवाड्यांमध्ये बालकांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच महिलांसाठी स्वयंपाक, हस्तकला, शिवणकाम आणि संगणक प्रशिक्षणासारख्या कौशल्यविकास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. यामुळे ग्रामीण व शहरी महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सुविधा वाढणार, गुणवत्ता उंचावणार
‘स्मार्ट अंगणवाडी’ उपक्रमामुळे मुलांना आनंददायी वातावरण, खेळण्यास पुरेशी जागा आणि संतुलित पोषण आहार मिळेल. आधुनिक साधनांमुळे शिक्षण अधिक आकर्षक आणि प्रभावी बनणार आहे. शासनाचा हा उपक्रम अंगणवाड्यांच्या दर्जा सुधारण्याबरोबरच समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठीही नवी दिशा ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी