
रत्नागिरी, 14 नोव्हेंबर, (हिं. स.) : ज्येष्ठ नागरिकांच्या घरातून दोन लाखांचे दागिने चोरल्या प्रकरणी मोलकरणीला दोन वर्षांचा कारावास आणि पाच हजाराच्या दंडाची शिक्षा राजापूर न्यायालयाने सुनावली आहे. राजापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एस. हाके यांनी ही शिक्षा सुनावली.
या प्रकरणी चंद्रकांत सखाराम शेलार (वय ६७ वर्षे, भटवाडी, सोलगाव, ता राजापूर) यांनी फिर्याद दिली असून वैष्णवी विलास नलावडे (वय ४२ वर्षे) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.
चंद्रकांत शेलार पत्नी चंद्रकला (वय ६४ वर्षे) यांच्यासोबत राहतात. पत्नीला मधुमेहाचा आजार असल्यामुळे घरकाम करताना त्रास होतो. त्यामुळे शेलार यांनी मोलकरीण हवी असल्याची जाहिरात स्थानिक वर्तमानपत्रांतून दिली. त्या जाहिरातीला प्रतिसाद देत आरोपी वैष्णवी नलावडे शेलार यांच्याकडे घरकामासाठी आली. पंधरा दिवस काम करून तिने शेलार दाम्पत्याचा विश्वास संपादन केला.
८ मार्च २०२५ रोजी दुपारी १.०० च्या दरम्यान शेलार दाम्पत्य दुपारचे जेवून हॉलमध्ये झोपले होते. वैष्णवी ‘मी टॉयलेटला जाऊन येते’, असे सांगून मागच्या दरवाजाने निघून गेली. ती दुपारी अडीचपर्यंत परत आली नाही, म्हणून श्रीमती चंद्रकला शेलार यांनी शोध घेतला तर त्यांना वैष्णवी कुठेही दिसली नाही. त्यांनी घरात येऊन वैष्णवीचे साहित्य पाहिले तर तिचे साहित्यदेखील घरात नव्हते. त्यानंतर कपाट उघडून पाहिले असता कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले दागिने व पाच हजारांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळले. त्यावरून चंद्रकांत शेलार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. चोरीला गेलेल्या मुद्देमालात ३ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ३.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील रिंग जोड, ४ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील कुड्यांचा जोड आणि ५००० रुपये रोख अशा एकूण २ लाख १३ हजार ७६० रुपयांच्या वस्तूंचा समावेश होता.
चोरी केल्यानंतर वैष्णवी गुजरातमधील वलसाड येथे तिच्या ओळखीच्या एका व्यक्तीकडे गेली. दरम्यान पोलिसांनी तिच्या मोबाइल नंबरवरील कॉल व मोबाइल लोकेशनवरून तपास सुरू केला. त्याआधारे गुजरातहून परत येताना तिला चिपळूण बसस्थानकात अटक करण्यात आली. पोलिसांनी घेतलेल्या अंगझडतीमध्ये वैष्णवीकडे शेलार यांच्या घरातून चोरलेले २ लाख ८ हजार ७६० रुपये किमतीचे ३ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, पाच हजाराची रोकड आणि इतर खोटे दागिने सापडले होते. वैष्णवी हिच्याकडे सापडलेले मंगळसूत्र व पाच हजाराची रक्कम शेलार दाम्पत्याला ओळख पटवल्यानंतर परत करण्यात आले होते.
या प्रकरणाची सुनावणी ३ जून २०२५ रोजी सुरू झाली तेव्हापासून वैष्णवी नलावडे तुरुंगात होती. ती तुरुंगात असतानाच ११ नोव्हेंबर २०२५ रोजी या प्रकरणात अंतिम निकाल देण्यात आला.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख यांनी केला. सचिन बळीप यांनी त्यांना साह्य केले. सरकार पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. सहाय्यक सरकारी वकील भालचंद्र सुभाष सुपेकर यांनी सरकार पक्षातर्फे साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या व अंतिम युक्तिवाद केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी