
अमरावती, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। घर, मालमत्ता खरेदी किंवा वारसा हक्कामुळे वीजबिलावरील ग्राहकाचे नाव बदलण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि जलद झाली आहे. महावितरणने ग्राहक सेवा डिजिटल करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत, वीजबिलावरील ग्राहकाचे बदलासाठीच्या नाव ऑनलाइन अर्जाना स्वयंचलित मंजुरी देण्यास सुरुवात केली आहे.
यामुळे ग्राहकांना कार्यालयांची धावपळ टाळून घरबसल्या जलद सेवा मिळणार आहे. मुख्यमंत्री व उर्जा मंत्री यांच्या निर्देशानुसार महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली ही नवी ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे अर्जाची छाननी आणि मंजुरी पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने होत असल्याने वेळेची मोठी बचत होणार आहे. महावितरणच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत असून, डिजिटल माध्यमातून सेवा पुरवणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांमध्ये महावितरणने पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे.
आर्थिक लूट थांबणार
वीज बिलावरील जुन्या ग्राहकाचे नाव बदलण्यासाठी महावितरण कार्यालय परिसरात काही केंद्र चालक आहेत. त्यांच्याकडून शुल्कासह जादा पैसे घेतले जात होते. यात ग्राहकांना ४०० ते ५०० रुपयांनी आर्थिक फटका बसत होता. आता ही आर्थिक लूट थांबण्यास मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी