
बालआनंद उत्सव-२०२५
छत्रपती संभाजीनगर, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।
कलांचे सादरीकरण हे नेहमीच आत्मविश्वास आणि संधी देत असते. मात्र विविध प्रकारचे कलासादरीकरणातून आपल्याला जीवनात विविध प्रसंगांना सामोरे जाण्याची म्हणजेच जीवन जगण्याची कलाही आपण शिकत असतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
येथील देवगिरी महाविद्यालयातील रविंद्रनाथ टागोर सभागृहात आयोजीत बालआनंद उत्सव २०२५ च्या प्रसंगी जिल्हाधिकारी स्वामी उपस्थित होते. बालकांनी सादर केलेल्या विविध कलागुणांचे सादरीकरण त्यांनी पाहिले. जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) आश्विनी लाटकर, प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, उपशिक्षणाधिकारी सीताराम पवार, श्रीमती सीमा मेहेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या बालदिनानिमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या वतीने दि.७ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंदोत्सव आयोजित करण्यात आला. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर शाळा आणि महाविद्यालयांमधून विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विविध कला व क्रीडा प्रकारातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ८१ आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर विशेष प्राविण्य प्राप्त, प्रज्ञावान व प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांचा सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाची सांगता आज सांस्कृतिक स्पर्धा व गुणगौरव सोहळ्याने झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील २९ शाळांच्या संघांनी सहभाग नोंदवला. यात समूह नृत्य, एकल नृत्य, नाट्य, गायन या सर्व कलाप्रकारांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती सुनीता वाघ, श्रीमती कविता रगडे, प्रवीण दाभाडे यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धांचे निकाल
समूह नृत्य-प्रथम क्रमांक - (वारकरी नृत्य) संत ज्ञानेश्वर विद्यालय निल्लोड फाटा, सिल्लोड , द्वितीय क्रमांक - ( आदिवासी नृत्य) पी एम श्री जिल्हा परिषद तुर्काबाद खराडी ता. गंगापूर.तृतीय क्रमांक- ( देशभक्तीपर गीत) ,आ कृ वाघमारे प्रशाला, छत्रपती संभाजीनगर
गीत गायन- प्रथम क्रमांक - राजे शिवाजी विद्यालय, वाळूज, पुनम चव्हाण,
नाट्यः- प्रथम क्रमांक - जिजामाता विद्यालय, छत्रपती संभाजी नगर.
वैयक्तिक नृत्यः- प्रथम क्रमांक- कार्तिकी चंदेल (लोकनेते साहेबराव पाटील विद्यालय शिल्लेगाव, तालुका गंगापूर)
भारुड प्रकार- प्रथम क्रमांक नेहरू विद्यालय सावखेडा.., तालुका वैजापूर.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis