सात राज्यांतील पोटनिवडणुकीत भाजपा-काँग्रेस प्रत्येकी दोन, आप, पीडीपी, झामुमोला एक जागा
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर (हिं.स.) - बिहार विधानसभा निवडणुकीसोबतच, सात राज्यांमधील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकांचा निकाल जवळपास समोर आला आहे. या जागांमध्ये राजस्थानमधील अंता, झारखंडमधील घाटशिला, पंजाबमधील तरनतारन, तेलंगणातील जुबली हिल्स, मिझोरम
भाजपा काँग्रेस आम आदमी पार्टी


नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर (हिं.स.) - बिहार विधानसभा निवडणुकीसोबतच, सात राज्यांमधील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकांचा निकाल जवळपास समोर आला आहे. या जागांमध्ये राजस्थानमधील अंता, झारखंडमधील घाटशिला, पंजाबमधील तरनतारन, तेलंगणातील जुबली हिल्स, मिझोरममधील दांपा, ओडिशातील नुआपाडा आणि जम्मू-काश्मीरमधील बडगाम आणि नागरोटा यांचा समावेश आहे.

पंजाबच्या तरनतारन विधानसभा पोटनिवडणुकीत 'आप'च्या हरमीत संधू यांनी बाजी मारली. त्यांनी ४२,६४९ मते मिळवत शिरोमणी अकाली दलच्या उमेदवार सुखविंदर कौर यांचा १२,०९१ मतांनी पराभव केला. तर, अपक्ष उमेदवार मनदिप खालसा १९,६२० मतांसाह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या जागेवर काँग्रेस आणि भाजपाची अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर पिछेहाट झाली.

राजस्थानच्या काँग्रेसच्या प्रमोद जैन यांनी ६९,५७१ मते मिळवत १५,६१२ मतांच्या फरकाने अंता विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत बाजी मारली. दुसऱ्या क्रमांकावरील भाजपच्या मोरपाल सुमन यांना केवळ ५३,९५९ मते मिळाली.

जम्मू-कश्मीरच्या नागरोटा विधानसभा जागा भाजपाने जिंकली. येथे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवयानी राणा यांनी ४२,३५० मते मिळवत २४, ६४७ मतांच्या फरकासह विजय मिळवला. जम्मू आणि काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टी (इंडिया) चे हर्ष देव सिंग दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तसेच बडगाम पोटनिवडणुकीत महबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाने बाजी मारली. पीडीपी उमेदवार आगा मुंतजिर मेहदी २१,५७६ मते मिळवून विजयी झाले. नॅशनल कॉन्फ्रंसच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची १७,०९८ मते मिळाली. तर, भाजपच्या उमेदवाराला केवळ २,६१९ मते मिळाली असून थेट सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

तेलंगाणाच्या जुबली हिल्स पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नवीन यादव यांनी ९८,९८८ मते मिळवत तब्बल २४,७२९ मतांच्या फरकासह विजय संपादन केला. बीआरएस उमेदवार मगंती सुनीता दुसऱ्या क्रमांकावर आल्या, तर भाजप उमेदवार दीपक रेड्डी यांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही.

झारखंडच्या घाटशिला पोटनिवडणुकीत २० पैकी १४ फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार सोमेश सोरेन ७४,७२० मते मिळवून २७,४८१ मतांच्या फरकासह आघाडीवर आहेत. भाजपचे बाबुलाल सोरेन ४७,२३९ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

ओडिशातील नुआपाडा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार जय ढोलकिया १,१२,५८७ मतांसह आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या २६ पैकी २३ फेऱ्यांनंतर ते तब्बल ७६,१४२ मतांच्या फरकाने पुढे आहेत. तर, ३६,४४५ मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे घासीराम मांझी आहेत.

मिझोरमच्या दांपा पोटनिवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंटच्या डॉ. आर ललथंगलियाना यांनी बाजी मारली. त्यांनी त्यांना एकूण ६९८१ मते मिळाली, तर झोरम पीपल्स मूव्हमेंटच्या (ZPM) उमेदवाराला ६४१९ मते मिळाली. विजयाचे अंतर ५६२ मतांचे होते. काँग्रेसच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची २,३८० मते मिळाली. तर, भाजप उमेदवार केवळ १५३७ मतांसह चौथ्या क्रमांकावर फेकला गेला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande