
नांदेड, 2 नोव्हेंबर (हिं.स.)।
भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या पुढाकारातून विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी १४.५० कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असून, याबाबतचे शासन निर्णय देखील निर्गमित झाले आहेत.
आ. श्रीजया चव्हाण यांनी सदर निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयान्वये भोकर विधानसभा मतदारसंघातील भोकर व मुदखेड नगरपरिषद आणि अर्धापूर नगर पंचायतीला विशेष रस्ते अनुदान तसेच नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी एकूण १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून भोकर, मुदखेड व अर्धापूर शहरातील रस्ते व नाल्यांचे बांधकाम केले जाणार आहे.
त्याचप्रमाणे भोकर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी २.५० कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये पाणंद रस्ते,नळकांडी पूल तसेच गावांतर्गत नाल्यांचे व रस्त्यांचे बांधकाम,पुतळ्यांचे सुशोभीकरण, संरक्षक भिंतींचे बांधकाम, शेडची उभारणी आदी कामांचा समावेश असेल. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत भोकर विधानसभा मतदारसंघासाठी २ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या निधीतून पर्यटन स्थळाचा दर्जा मिळालेल्या अनेक गावांमध्ये सांस्कृतिक सभागृह व सभामंडपांची उभारणी केली जाईल.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis