
मुख्यमंत्र्यांनी मानले चिनी राजदूताचे आभार
नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर (हिं.स.) : केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी दावा केला की, केरळमधून अत्यंत दारिद्र्य संपले आहे. त्यांच्या दाव्यानंतर चिनचे भारतातील राजदूर शू फेइहोंग यांनी केरळला ऐतिहासीक कामगिरीबद्दल शुभेच्छा असे म्हणत ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन केले. तर साम्यवादी चीनकडून झालेल्या कौतुकाबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राजदूतांचे आभार व्यक्त केले आहेत.
चिनी राजदूत शू फेइहोंग यांनी केरळ सरकारला राज्यात 'अत्यंत दारिद्र्य' संपविण्याच्या ऐतिहासिक यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट करताना म्हटले की दारिद्र्याचे निर्मूलन हा संपूर्ण मानव समाजाचा एकत्रित उद्देश आहे. चिनी राजदूतांनी लिहिले, “केरळला अत्यंत दारिद्र्य संपविण्याच्या ऐतिहासिक यशाबद्दल हार्दिक अभिनंदन. दारिद्र्य दूर करणे हे मानवतेचे सामाईक मिशन आहे.” राजदूतांच्या या प्रतिसादावर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आभार व्यक्त केले. त्यांनी म्हटले की केरळचे हे यश सामाजिक न्याय आणि मानवी सन्मानासाठीच्या आमच्या कटिबद्धतेचे द्योतक आहे. मुख्यमंत्री विजयन यांनी ‘एक्स’वर लिहिले, “ मनःपूर्वक शुभेच्छांसाठी धन्यवाद. अत्यंत दारिद्र्य संपविण्यात मिळालेल्या यशामुळे आपल्या सामायिक बांधिलकीचे दर्शन घडते. तुमच्या प्रोत्साहनपर शब्दांसाठी आभार.” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी केरळला अत्यंत दारिद्र्य-मुक्त राज्य घोषित केले. त्यांनी 1 नोव्हेंबर रोजी विधानसभेत घोषणा केली की राज्य आता पूर्णपणे अत्यंत दारिद्र्यापासून मुक्त झाले आहे.
केरळ पिरवी दिनाच्या निमित्ताने करण्यात आलेली ही ऐतिहासिक घोषणा जनतेसाठी अभिमानाचा क्षण ठरली. विजयन यांनी सांगितले की 2021 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत अत्यंत दारिद्र्य निर्मूलनाचा संकल्प करण्यात आला होता, आणि आता तो निवडणूक आश्वासने पूर्ण करून ‘नवा केरळ’च्या दिशेने एक मोठे पाऊल टाकण्यात आले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी