
नाशिक, 6 डिसेंबर, (हिं.स.) : अवैध बांधकामाची खोटी तक्रार दाखल करत ती मागे घेण्यासाठी उद्योजकाला धमकावत तीन लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या खंडणीखोर संतोष शर्मा याच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शर्मा याच्या विरोधातील खंडणीचा हा पाचवा गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादी निखिल राऊत (५१, रा. कांदिवली) यांची अंबड औद्योगिक वसाहतीत कंपनी आहे. या कंपनीत - अवैध बांधकाम केल्याचा आरोप करत संशयित संतोष शर्मा याने एमआयडीसी कार्यालयात त्यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली. तक्रार मागे घेण्यासाठी त्याने राऊत यांना धमकावत दीड लाख रुपये उकळले होते. ३१ ऑक्टोबरला सायंकाळी माउली लॉन्स येथे बोलवत शर्मा याने पुन्हा दडपण आणले. आणखी दीड लाख रुपये द्या, नाही तर तुमच्या जिवाचं काही खरं नाही अशी धमकी देत त्याने आणखी दीड लाख रुपये घेतले. एकूण तीन लाखांची खंडणी शर्मा याने जबरदस्तीने वसूल केल्याचे फिर्यादीने पोलिस तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी फिर्यादी राऊत यांच्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात शर्मा विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिलीप भंडे तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV