

विशाखापट्टणम , 6 डिसेंबर (हिं.स.)यशस्वी जयस्वालचे शतक (११६*), रोहित शर्मा (७५) आणि विराट कोहली (६५*) यांच्या अर्धशतकांमुळे भारतीय संघाने विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सने पराभव करून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. यामुळे त्यांच्या कसोटी मालिकेतील पराभवाचा बदलाही घेतला. दोन्ही संघांमधील टी-२० मालिका आता ९ डिसेंबर रोजी खेळली जाणार आहे.
२७१ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्या सलामी जोडीने शानदार सुरुवात केली. त्यांनी १५५ चेंडूत पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी केली . पण केशव महाराजने रोहितला बाद करून ही भागीदारी मोडित काढली. शतकाच्या मार्गावर असलेल्या रोहित मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात बाद झाला. त्याने ७३ चेंडूत ७५ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. या खेळीदरम्यान रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०,००० धावाही पूर्ण केल्या.
रोहित बाद झाल्यानंतर, फॉर्ममध्ये असलेला विराट कोहली मैदानावर आला. त्याने यशस्वीलाही साथ दिली आणि धावगती स्थिर ठेवली. यशस्वीने १११ चेंडूत शतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूला विराट कोहली मोठे फटके मारत होता. त्याने काही उत्कृष्ट षटकार आणि चौकारही मारले. त्याने ४० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. भारतीय संघाने ३९.५ षटकांत लक्ष्य गाठले. यशस्वी ११६ आणि कोहली ६५ धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, २० सामन्यांच्या प्रतीक्षेनंतर, भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकली. यामुळे भारतीय क्रिकेटपटूंपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांना आनंद झाला. दव पडल्याचे लक्षात घेऊन राहुलने जलद गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा संघ ४७.५ षटकांत २७० धावांवर गारद झाला. क्विंटन डी कॉकने सर्वाधिक १०६ धावा केल्या. हे त्याचे २३ वे एकदिवसीय शतक होते.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा अर्धशतक पूर्ण करु शकला नाही. त्याने ६७ चेंडूत ४८ धावा केल्या. सलामीवीर रायन रिकल्टनला पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगने धावा न देता बाद केले. मॅथ्यू ब्रीट्झकेने २४, एडेन मार्करामने १, डेवाल्ड ब्रुइसने २९, मार्को जॅन्सेनने १७, कॉर्बिन बॉशने ९, लुंगी एनगिडीने १ आणि ओटनील बार्टमनने ३ धावा केल्या.
केशव महाराजांनी नाबाद २० धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णाने शानदार गोलंदाजी केली. कुलदिप यादव आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. त्याने ६६ धावा दिल्या. तर अर्शदीप सिंग आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे