
ठाणे, 6 डिसेंबर (हिं.स.)। : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील मान्यवर गायक पं. सुरेश बापट यांच्या प्रभावी गायनाने संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोहातील पहिले पुष्प शुक्रवारी रात्री राम गणेश गडकरी रंगायतन येथे गुंफले. पं. सी आर व्यास यांनी निर्माण केलेल्या राग धनकोनी कल्याण मधील ख्याल ‘सरस सूर गाऊ आणि ‘द्रुत धन रे धन सुदिन आज’ सुरूवातीला सादर करीत आपल्या गायकीचे वैशिष्टयपूर्ण दर्शन देत त्यांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
ठाणे महानगरपालिका आयोजित 30 वा. संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सव शुक्रवार ( 5 डिसेंबर) पासून सुरू झाला. या महोत्सवातील पहिल्या पुष्पाला रसिकांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमास ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर, पं. मुकुंद मराठे, पं. विवेक सोनार, कथ्थक नृत्यांगना निधी प्रभू, रवी नवले, पं. राम मराठे यांचे कुटुंबीय तसेच ठाणेकर दर्दी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पं. सुरेश बापट यांचा सन्मान महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व उपायुक्त उमेश बिरारी यांच्या हस्ते करण्यात आला.
पं. सुरेश बापट यांच्या गायकीची भव्यता ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर घराण्यांच्या शैलीवर आधारित आहे. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांना संगीत साधनेचा प्रवास सुरू केला. त्यांना लीलाताई शेलार, स्व. भास्करराव फाटक, अच्युत अभ्यंकर यांच्यासारखे गुरू लाभले. ज्यांची गाणी आतापर्यत ऐकत आलो आहे त्या आशाताई खाडिलकर यांच्यासमोर कार्यक्रम करताना एक वेगळाचा आनंद असल्याचे पं. सुरेश बापट यांनी नमूद केले.
पं. राम मराठे महोत्सवात तिसऱ्यांदा कार्यक्रम सादर करण्याचे भाग्य मला लाभले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. डॉ. अशोक रानडे यांच्याकडून मिळालेला मारवा आणि बिहाग या दोन रागांच्या छटा असलेला ‘मारु’ हा जोड राग त्यांनी गायला. तद्नंतर मालव यामिश्र रागातील पारंपारिक मध्यलयातील ‘राधे राधे अमृतफूल’ पं. सी आर व्यास रचित ‘द्रुत तू है रंगीला मेरा’ सादर केले. कार्यक्रमाचा समारोप पं. सुरेश बापट यांनी ‘बाजू बंद खुल खुल जा’ या पारंपारिक ठुमरी भैरवीने करीत रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळविली. पं. सुरेश बापट यांना तबल्यावर सुहास चितळे, संवादिनीवर नीला सोहोनी यांनी तर तानपुऱ्यावर अमेय कारुळकर, श्रेयस व्यास, चैतन्य देशपांडे आणि आयुष देशपांडे यांनी साथसंगत केली.
पहिल्या रसिकाचा सन्मान
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून गेली 30 वर्षे पं.राम मराठे महोत्सव सुरू असून या महोत्सवाची पहिली प्रवेशिका घेणाऱ्या रसिकांचा सन्मान महापालिकेच्या माध्यमातून केला जातो. या वर्षी पहिली प्रवेशिका अच्युत पंडित यांनी घेतली होती. त्यांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर