
डोंबिवली, 7 डिसेंबर, (हिं.स.)।
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे व्हिजन असलेले खासदार आहेत. ज्यावेळी एखाद्या मतदारसंघाला व्हिजन असलेला लोकप्रतिनिधी लाभतो त्यावेळी मतदारसंघाचा निश्चितच कायापालट होतो. याचे उदाहरण कल्याण लोकसभा मतदारसंघात दिसून येते. खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोणतेही काम एकदा हातात घेतले तर ते तडीस नेई पर्यंत त्याचा पाठपुरावा करत असतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच डोंबिवली येथे उभारण्यात येणारे वै.ह.भ.प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलमुळे जिल्ह्यातील खेळाडूंना एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. असे ही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी डोंबिवली येथील वै.ह.भ.प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाच्या पुनर्विकासाच्या कामाचे आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन पार पडले. सुमारे १८० कोटी रुपयांच्या निधीतून क्रीडा संकुलाच्या टप्पा - १ ची उभारणी करण्यात येणार आहे. तर १५ कोटी रुपयांच्या निधीतून सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्याची उभारणी करण्यात येणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कामे आज मार्गी लागत आहेत. याचसमवेत क्रीडा संकुलाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणा वॉर मेमोरिअलचे उदघाटन यावेळी करण्यात आले. डोंबिवली येथील वै.ह.भ.प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडांगणात हा कार्यक्रम पार पडला.
महायुती सरकारच्या कार्यकाळात आपण राज्यातील प्रत्येक शहरासाठी भरीव निधी देण्याचे काम केले. तसेच शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून नागरिकांच्या घरपोच त्यांना अनेक शासकीय सुविधांचा लाभ मिळवून दिला. महिला सक्षमीकरणासाठी, युवकांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी आपण अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच पद्धतीने कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी देखील आजवर कोट्यावधी रुपयांचा निधी आपण मंजूर केला आहे. यामुळे मतदार संघाचा अधिक गतीने विकास होत आहे. असेही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही कायम सुरूच राहील कोणीही बंद करू शकत नाही अशी स्पष्टोक्ती देखील यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कमी काळातही कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी निश्चितच भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, असेही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी मंत्री उदय सामंत, भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण, आमदार सुलभा गायकवाड, आमदार राजेश मोरे, पदमश्री गजाजन माने, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते.
*विकासाचेच राजकारण चालणार - खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे*
कल्याण डोंबिवली शहर गेल्या दहा वर्षात बदलले. २०१४ नंतर या शहरासाठी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत याची मी सुरुवात केली. कधीही राजकारणाला प्राधान्य दिले नाही तर पहिल्या दिवसांपासून फक्त आणि फक्त विकासकामे कशी होतील याच्यावर भर दिला. मेट्रोचं जाळ आपल्या मतदारसंघात दिसणार आहे. मेट्रो, उड्डाणपूल, शिळफाटा रस्त्याचे सहापदरीकरण, रेल्वेच्या अतिरिक्त मार्गिका यांसारखे अनेक मोठे प्रकल्प आज मतदारसंघात उभे राहत आहे. यामुळे आज आपले कल्याण डोंबिवली शहर बदलत आहेत, असे यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर