मेळघाटात पहिल्यांदाच उच्चस्तरीय संयुक्त पाहणी दौरा संपन्न
अमरावती, 7 डिसेंबर, (हिं.स.) मेळघाटातील माता व बालमृत्यूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या तीन प्रधान सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी दौरा केला. इतिहासात पहिल्यांदाच असा उच्चस्तरीय संयुक्त दौरा झाला असून, या दौऱ्यातील निरीक
मेळघाटात पहिल्यांदाच उच्चस्तरीय संयुक्त पाहणी दौरा:


अमरावती, 7 डिसेंबर, (हिं.स.)

मेळघाटातील माता व बालमृत्यूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या तीन प्रधान सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी दौरा केला. इतिहासात पहिल्यांदाच असा उच्चस्तरीय संयुक्त दौरा झाला असून, या दौऱ्यातील निरीक्षणे १८ डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सादर केली जाणार आहेत. याच दिवशी मेळघाटसंबंधी याचिकेची सुनावणीही होणार आहे.

पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, ‘खोज’चे ॲड. बंड्या साने आणि इतरांनी २००७ पासून मेळघाटातील समस्यांवर अनेक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. न्यायालयाने या सर्व याचिका एकत्रित करून सुनावणी सुरू ठेवली आहे. याचिकाकर्त्यांच्या मते, माता व बालमृत्यूसह इतर समस्यांमागे सरकारी यंत्रणेतील उणिवा आहेत. त्यामुळे न्यायालयानेच राज्य सरकारमधील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष संयुक्त पाहणीचे निर्देश दिले होते.

या निर्देशानुसार, आदिवासी विकास, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य या तीन विभागांचे प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव आणि एकात्मिक बालविकास विभागाचे (आयसीडीएस) आयुक्त यांनी वेगवेगळ्या सहा चमू तयार केल्या. या चमूंनी शनिवारी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.

या बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. विनायक निपुण, आयसीडीएसचे आयुक्त कैलास पगारे, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह जिल्ह्यातील बहुतेक विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी याचिकाकर्ते पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि ॲड. बंड्या साने यांच्यासह इतर विभागप्रमुखांना येणाऱ्या अडचणी ऐकून घेण्यात आल्या.

दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर प्रधान सचिव डॉ. निपुण आणि आयुक्त पगारे यांनी न्यायालयासमोर वास्तव मांडण्याचे मान्य केले. तत्पूर्वी, शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना जे बदल आवश्यक वाटतात, त्यादृष्टीने तातडीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्यविषयक जागृतीसाठी एक अभियान राबवणे, मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कृती आराखडा तयार करणे तसेच नागरिकांची आरोग्यविषयक मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, सुपरस्पेशालिटीचे प्रमुख डॉ. अमोल नरोटे, जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील जाधव आदी स्थानिक अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande