
गडचिरोली, 7 डिसेंबर (हिं.स.)
गडचिरोली जिल्ह्याच्या संवेदनशील व दुर्गम भागातून वाढलेल्या मोबाईल टॉवर बॅटरी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. यानुसार, एलसीबीच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून मोबाईल टॉवर बॅटरी चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, त्यांना अटक केली आहे.
सतत १५ दिवस संवेदनशील भागांत पाळत ठेवल्यानंतर, रात्रीच्या वेळी टॉवर परिसरात संशयास्पदरीत्या फिरणारे एक पिकअप वाहन पोलिसांना आढळले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गोविंद खंडेलवार (१९, रा. आलापल्ली) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हे वाहन चोरीचे असून, तो आणि उमेश मनोहर इंगोले (३८, रा. नेहरुनगर, गडचिरोली) व इतर दोन साथीदारांच्या मदतीने मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरत असल्याची कबुली दिली.
चोरलेल्या बॅटऱ्या ते अहेरी येथील तिरुपती व्यंकया दासरी (३८) याला विकत होते, जो पुढे त्या कागजनगर येथील एका व्यक्तीला विकत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
उघडकीस आलेले गुन्हे व जप्ती:
या कौशल्यपूर्ण तपासामुळे गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेले मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे ०८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील गुन्हे : पोस्टे अहेरी (०२), उपपोस्टे पेरमिली (०२), पोमकें येमली बुर्गी (०२), पोस्टे ताडगाव (०१), राजाराम (खां) (०१)
इतर गुन्हा: पोस्टे गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) येथील ०१ वाहन चोरीचा गुन्हा.
बॅटरी विक्रीतून मिळालेली ०२ लाख रुपये रोख रक्कम, चोरीचे ०३ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन आणि इतर साहित्य, असा एकूण ०५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
आरोपी सध्या पोमकें येमली बुर्गी येथील गुन्ह्यात अटकेत असून, सर्व गुन्ह्यांचा तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. श्री. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात यशस्वी करण्यात आली
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond