
लेह, 7 डिसेंबर (हिं.स.)। तुरुंगात बंद असलेल्या पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नजरकैदेविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे.
वांगचुक यांच्या पत्नी गीतांजलि जे. अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी होईल. या याचिकेत राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) अंतर्गत झालेल्या वांगचुक यांच्या नजरकैदेला आव्हान देत ते बेकायदेशीर असून मौलिक हक्कांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांची खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करू शकते.
याआधी 29 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंगमो यांच्या सुधारित याचिकेवर केंद्र तसेच लडाख प्रशासनाकडून उत्तर मागितले होते. मात्र केंद्र आणि केंद्रशासित प्रदेश लडाखच्या वतीने उपस्थित सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी उत्तर देण्यासाठी काही वेळ मागितला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 24 नोव्हेंबर रोजीची सुनावणी पुढे ढकलली होती.
अंगमो यांच्या याचिकेत म्हटले आहे की, “सोनम वांगचुक यांना जुन्या एफआयआर, अस्पष्ट आरोप आणि केवळ अंदाजांवर आधारित कारणांमुळे नजरकैदेत ठेवले आहे. या कारवाईला कायदेशीर आधार नाही आणि प्रतिबंधात्मक अधिकारांचा असा मनमाना वापर संवैधानिक स्वातंत्र्यावर आघात करतो.”या याचिकेत वांगचुक यांची नजरकैद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शिक्षण, नवोपक्रम आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील त्यांच्या राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त कार्यानंतर अचानक त्यांना लक्ष्य करण्यात आले, हे पूर्णपणे निरर्थक असल्याचे म्हटले आहे.
अंगमो म्हणाल्या की 24 सप्टेंबर रोजी लेहमध्ये घडलेल्या दुर्दैवी हिंसाचाराला वांगचुक यांच्या कोणत्याही कृती किंवा विधानांशी जोडता येत नाही. वांगचुक यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून हिंसेची निंदा केली होती. त्यांनी स्पष्ट केले होते की हिंसा झाली तर लडाखची तपस्या आणि गेल्या पाच वर्षांची शांततापूर्ण चळवळ नाकाम होईल. वांगचुक म्हणाले होते की, “हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात दुःखद दिवस होता.”
दरम्यान, सोनम वांगचुक यांना 26 सप्टेंबर रोजी कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) अंतर्गत नजरकैदेत घेतले गेले. लडाखला राज्याचा दर्जा देण्याची आणि सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करताना लेहमध्ये हिंसक आंदोलन झाले होते. या आंदोलनात चार जणांचा मृत्यू झाला आणि 90 जण जखमी झाले. हिंसा झाल्यानंतर दोन दिवसांनी वांगचुक यांना हिंसा भडकवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode