

* उन्मत्त व्यावसायिक अतिक्रमणवाद सहन करणार नाही - छत्रपती संभाजीराजे
मुंबई, ७ डिसेंबर (हिं.स.) : दुर्गराज रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आज भग्नावस्थेत आहे. त्याचे संवर्धन करायचे म्हटले तरी पुरातत्व विभागाच्या अगणित नियम आणि अटींचे अडथळे आहेत. अगणित बैठका, वारंवार पाठपुरावा आणि लेखी परवानग्या घेतल्याशिवाय पुरातत्त्व विभाग रायगड विकास प्राधिकरणाला गडावरील एक दगडही हलवू देत नाही. पण रोपवे कंपनीस मात्र रायगडावर विनापरवानगी हॉटेल, रेस्टोरेंट, कॅफे आणि सिमेंट काँक्रीटचे असे भव्य राजवाडे बांधण्यास खुली मुभा दिली आहे.
रोपवे कंपनीने कसलीही परवानगी नसताना गडावर अतिक्रमण करून हॉटेल, कॅफे, रेस्टोरेंट अशी हजारो स्क्वेअर फुटांची मोठमोठी बांधकामे केली आहेत. विशेष म्हणजे पुरातत्व विभागाने काम थांबवण्याच्या नाममात्र नोटिसा दिल्यानंतर देखील त्या डावलून ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत. एका व्यावसायिक कंपनीकडे इतके धाडस व आडमुठेपणा येतो कुठून ?
जिथे या भारतभूमीने स्वातंत्र्याचा पहिला सूर्य पाहिला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसदरेवर व नगारखान्यावर छत बसविण्याकरिता मी गेले पाच-सात वर्षे दिल्लीत पाठपुरावा करीत आहे, मात्र वास्तुरचनात्मक पुरावे असून देखील आजही त्यासाठी परवानगी नाकारली जाते. या ऐतिहासिक वास्तूंना छत नाही, मात्र गडावर विनापरवानगी उभारलेल्या या अनधिकृत हॉटेल्सची विद्रूप छतं जाणिवपूर्वक दुर्लक्षित केली जातात !
गडास भेट देणाऱ्या लाखो शिवभक्तांसाठी आवश्यक अशा मूलभूत सोयी निर्माण करताना पुरातत्व खाते रायगड विकास प्राधिकरणाला अनेक नियमांच्या चौकटी घालते. कित्येक वेळा चालू कामांना स्थगिती दिली जाते. मात्र या व्यावसायिक रोपवे कंपनीस गडावर महागडे हॉटेल, महागड्या आलिशान रूम्स, कॅफे बांधून व्यवसाय करायला खुली सूट देते ! यामागचे गौडबंगाल काय, हे शोधणे गरजेचे आहे.
महाराजांच्या गडावर सरकारी नियम, नोटीसा धुडकावून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या आडमुठ्या व्यावसायिक कंपनीला कुणाचे पाठबळ आहे ? रायगडच्या संवर्धनापेक्षा या कंपनीच्या आर्थिक फायद्यास अधिक महत्त्व देण्याची काय गरज आहे, अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे.
नुकताच दुर्गराज रायगड युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाला आहे. गडावर अशी बेकायदेशीर बांधकामे होत राहिली तर हे नामांकन देखील धोक्यात येऊ शकते. याला जबाबदार कोण असणार ? केवळ ही कंपनी, वेळीच कठोर कारवाई न करणारा पुरातत्व विभाग, राज्य व केंद्र सरकार की या कंपनीला पाठीशी घालणारे लोक ?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र गडावर असा उन्मत्त व्यावसायिक अतिक्रमणवाद सहन केला जाणार नाही. रायगडाच्या अस्मितेपेक्षा मोठे काहीही असू शकत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी