
ठाणे, 7 डिसेंबर (हिं.स.)
देशात महाराष्ट्र राज्य ही कलाकारांची राजधानी आहे. तर कोकण प्रांताने राज्याला आणि देशालाही मोठमोठे कलाकार दिले. कोकण चषक स्पर्धेतून असंख्य कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाले, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले.
कोकण कला अकादमी, कोमसाप आणि आमदार संजय केळकर आयोजित कोकण चषक राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर मिनी नाट्यगृहात पार पडली. यावेळी पारितोषिक वितरण समारंभात आमदार संजय केळकर बोलत होते.
श्री.केळकर पुढे म्हणाले, स्पर्धेचे हे १९वे वर्ष असून आजवर असंख्य कलाकारांना या स्पर्धेमुळे हक्काचे व्यासपीठ मिळाले, अनेक कलाकार राज्याला आणि देशाला मिळाले. केवळ अभिनेतेच नाही तर बॅक स्टेज कलाकारांसाठी सुद्धा ही स्पर्धा मैलाचा दगड ठरली. अशा स्पर्धा होत असताना कलाकारांना प्रशिक्षणही देणे गरजेचे आहे, असे मत श्री. केळकर यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप ढवळ, समन्वयक प्रा. मंदार टिल्लू आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत कोकण विभागातून १८हून अधिक एकांकिका सादर झाल्या. अंतिम फेरीत धडकलेल्या एकांकिकेतून आल्डेल एज्युकेशन ट्रस्ट सेंट जॉन कॉलेजची हॅश टॅग इनोसंट ही एकांकिका प्रथम आली. ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयाची 'मढं निघालं अनुदानाला' द्वितीय तर एनकेटी महाविद्यालयाची 'रेशन कार्ड' या एकांकिकेने तिसरे पारितोषिक पटकावले.
सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रघुनंदन बर्वे प्रथम (हॅश टॅग इनोसंट), प्रसनजित गायकवाड द्वितीय (मढं निघालं अनुदानाला) आणि योगेश केसकर, श्रीरंग खटावकर, कैलास जोशी आणि दीपक सावंत यांना तिसरे पारितोषिक (तरुणाई) प्राप्त झाले.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून धनश्री पराडकर प्रथम (हॅश टॅग इनोसंट), विजया गुंडप द्वितीय (रेशन कार्ड) आणि रुचिका घाडी, सुमित्रा देवधर यांना तिसरे पारितोषिक (हॅश टॅग इनोसंट) प्राप्त झाले.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन म्हणून निलेश गोपनारायण प्रथम (हॅश टॅग इनोसंट), महेश कापरेकर, सागर चव्हाण द्वितीय (मढं निघालं अनुदानाला) आणि प्रथमेश पवार, साई शिर्सेकर यांना तिसरे पारितोषिक (रेशन कार्ड) प्राप्त झाले.
संदीप दंडवते (हॅश टॅग इनोसंट), सर्वोत्कृष्ट लेखक, विनीत म्हात्रे, सर्वोत्कृष्ट नेपथ्य (हॅश टॅग इनोसंट), चिन्मय सावंत, सुबोध मालणकर सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत (मढं निघालं अनुदानाला) आणि सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनेसाठी श्याम चव्हाण (मढं निघालं अनुदानाला) यांची निवड झाली. परीक्षक म्हणून अतुल काळे, स्मिता सदावर्ते आणि ऋतुजा बागवे यांनी काम पाहिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर