
लातूर, 7 डिसेंबर (हिं.स.)।
नगर परिषद निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी ७३.३% विक्रमी मतदान झाले, जे २०१६ च्या तुलनेत सुमारे ४.९३ टक्क्यांनी अधिक आहे. एकूण २७ हजार ५४० मतदारांनी आपला हक्क बजावला. या वाढलेल्या मतदानाच्या टक्क्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले असून, हा वाढीव टक्का कोणत्या उमेदवाराच्या पथ्यावर पडेल, यावर जोरदार आकडेमोड सुरू झाली आहे. मतमोजणीची तारीख २१ डिसेंबर असल्याने, आगामी २० दिवस शहरात राजकीय चर्चांचे गुऱ्हाळ रंगणार आहे.
२०१६ मध्ये ६८% मतदान झाले होते, तर यावर्षी मतदानाचा टक्का ७३.३% वर पोहोचला. स्वीप (SVEEP) पथकाच्या जनजागृतीमुळे मतदानाचा टक्का वाढल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मंजूषा लटपटे यांनी सांगितले. सर्वाधिक ८४.९८% मतदान प्रभाग ४ मधील केंद्रावर झाले, तर सर्वात कमी मतदान प्रभाग क्र. २ मधील जिल्हा परिषद शाळेत नोंदवले गेले.
नगराध्यक्षपदासाठी 'कांटे की टक्कर'
नगराध्यक्षपदासाठी एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. यात प्रमुख पक्षांकडून लढत अटळ आहे:
राष्ट्रवादी काँग्रेस: अभय मिरकले
भारतीय जनता पक्ष (भाजप): अॅड. स्वप्निल व्हते
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: शेख कलोमोदीन अहमद
वंचित बहुजन आघाडी: सय्यद साजिद कबीर
बहुजन समाज पार्टी: रमेश गायकवाड
२०१६ चा निकाल: अपक्ष उमेदवाराचा विजय ठरला होता निर्णायक
यावेळी वाढलेला टक्का कोणाच्या बाजूने जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, कारण २०१६ च्या निवडणुकीत अपक्ष, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात प्रमुख लढत झाली होती. त्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार अश्विनी कासनाळे यांना ६,४३६ मते मिळाली होती, तर रजनी रेड्डी यांना ६,०६८ मते मिळाली. त्याचप्रमाणे, कल्पना रेड्डी यांना १,३५८, शेख खाजा बेगम यांना २,२२७ आणि शेख शहनाजवीन यांना ४,२६२ मते मिळाली होती. अश्विनी कासनाळे यांनी केवळ ३६८ मतांनी विजय मिळवत, इतर प्रमुख पक्षांना धक्का दिला होता.
दिग्गजांची उपस्थिती, आरोप-प्रत्यारोपांचे फैरी
निवडणूक प्रतिष्ठेची झाल्यामुळे सकाळपासूनच सर्वच पक्षाचे नेते व कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर तळ ठोकून होते. यात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) जिल्हाध्यक्ष विनायकराव पाटील, भाजपचे गणेश हाके, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता.
प्रचारादरम्यान विकासकामांवर चर्चा झाली असली तरी, मंत्री बाबासाहेब पाटील, विनायकराव पाटील आणि भाजपचे गणेश हाके यांच्यात झालेले आरोप-प्रत्यारोपांचे फैरी चर्चेचा मुख्य मुद्दा ठरले.
किरकोळ बाचाबाची, कडेकोट बंदोबस्त
मतदान प्रक्रियेदरम्यान प्रभाग ६ मधील पशुसंवर्धन केंद्रावर एका महिलेचे मतदान अगोदरच झाल्याच्या संशयावरून राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. मात्र, उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद रायचोले यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान शांततेत पार पडले. सायंकाळी सर्व ईव्हीएम मशीन डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्ट्रॉग रूममध्ये सील करण्यात आले असून, स्ट्रॉग रूमला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
यावर्षीचा वाढलेला टक्का कोणाच्या बाजूने झुकतो, हे पाहण्यासाठी २१ डिसेंबरच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis