
ठाणे, 7 डिसेंबर, (हिं.स.)। “मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा दुर्मीळ आजार असला तरी या मुलांची इच्छाशक्ती अत्यंत प्रबळ आहे. त्यांच्या ‘विलपॉवर’मुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन करत या आजारावर लस उपलब्ध व्हावी म्हणून राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
स्वर्गीय गंगुबाई शिंदे सभागृहात आयोजित मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त आणि गरजू रुग्णांसाठी इलेक्ट्रिक व्हीलचेअर व ‘वॅटमेड बायपॅप’ मशीन वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, डॉ. मंगेश पेडामकर, हरिश्चंद्र सावंत हेदेखील उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या मदतीने करण्यात आले होते. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांना आणि गरजू रुग्णांना इलेक्ट्रिक व्हीलचेअर, बायपॅप मशीन तसेच इतर वैद्यकीय साहित्याचे वितरण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ 100 अतिरिक्त इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा केली. तसेच गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि पोर्टेबल वेंटिलेशन उपकरणे उपलब्ध करून देण्याची तयारीही व्यक्त केली.
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी फिजिओथेरपी अत्यावश्यक असल्याचे नमूद करत ते म्हणाले, “या उपचारांसाठी लागणारा खर्च कमी करण्यासाठी सीएसआर निधी, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि लोकसहभागातून व्यापक मदत उभी करू.”
शासनाच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचाही उपक्रम हाती घेत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. “एसटी, मेट्रो, मोनो यांसह सार्वजनिक वाहतुकीत या मुलांच्या प्रवासासाठी अनुकूल सुविधा निर्माण केल्या जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, थेरपी सेंटर सुरू करण्याबाबत प्रस्ताव पुढे सरकला असून लवकरच त्यावर कार्यवाही केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन आणि सहकार्याबद्दल संस्थांचे अभिनंदन करत ते म्हणाले, “या मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य टिकवण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व प्रयत्न शासन आणि समाजाच्या माध्यमातून केले जाणार आहेत.”
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर