
रायगड, 9 डिसेंबर (हिं.स.)।अलिबाग शहराजवळ असलेली सुमारे चार एकर क्षेत्रफळाची सरकारी वसाहत आज दयनीय अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे. कधी काळी सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कुटुंबांनी गजबजलेली ही वसाहत आता पूर्णपणे दुर्लक्षित होऊन जंगली झाडझुडपांनी व्यापली आहे. पडक्या व मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये दारूची विक्री, जुगार, तसेच अनैतिक प्रकार खुलेआम सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत यांनी या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धायतडक व उपअभियंता विनायक तेलंगे यांची भेट घेऊन वसाहतीच्या दुरवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी सदर वसाहतीचा प्रस्ताव शासनाकडे पूर्वीच पाठविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असून, जागेला कुंपण घालण्यासाठी निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले.
या मौल्यवान सरकारी जमिनीवर नवीन नियमांनुसार सहा ते सात मजली इमारती उभारण्यात आल्या, तर जिल्हा मुख्यालयातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निवासाचा प्रश्न सुटू शकतो, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. मात्र सध्या प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याचे ढीग साठले असून, मोकाट गुरे व कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.ज्येष्ठ विधिज्ञ जे. टी. पाटील, डॉ. पाटणकर व अमित नारे यांनी या बाबत चेंढरे ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार केली आहे. ग्रामपंचायतीचे प्रशासक साळावकर यांनी कचरा त्वरित उचलण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले.
दरम्यान, “सरकारचे लक्ष आहे तरी कुठे?” असा थेट सवाल उपस्थित करत प्रशासनाने त्वरित ठोस कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके