
कोल्हापूर, 9 डिसेंबर (हिं.स.)। उद्योजकांनी शासकीय कामासाठी शॉर्टकट न स्वीकारता एखादा केंद्रीय सरकारी अधिकारी अथवा कर्मचारी, लोकसेवक यांनी लाचेची मागणी केली तर निसंकोचपणे तक्रार द्यावी असे आवाहन सीबीआय, लाचलुचतपत प्रतिबंध कार्यालय, पुणे च्या पोलिस निरिक्षक शीतल पाटील यांनी केले. केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI), लाचलुचपत प्रतिबंधक शाखा (ACB) व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'चला भ्रष्टाचार संपवू या' या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, बँका, पोस्ट ऑफीस, भविष्य निधी कार्यालय, आयकर कार्यालय, केंद्रीय जीएसटी विभाग, रेल्वे विभाग याठिकाणी व्यापारी-उद्योजकांना आपल्या कामासाठी जावे लागते. अशाठिकाणी लाच मागितल्यास आपल्याकडे तक्रार द्यावी असे सांगितले.
लाचलुचपत प्रतिबंधक शाखा, कोल्हापूर च्या पोलिस निरिक्षकमा. उज्वला भडकमकर यांनी राज्य स्तरावरील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी लाचेची मागणी केल्यास भाऊसिंगजी रोड वरील कार्यालयात तक्रार देण्याचे आवाहन केले. तसेच एखाद्या अधिकाऱ्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत मालमत्ता जादा दिसत असेल तर अशा अधिकाऱ्यांची नांवे आमच्याकडे द्यावीत. तक्रारदाराचे नांव गोपनीय ठेवले जाईल असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी व्यापारी-उद्योजकांनी अधिकाऱ्यांना लाच न देण्याची शपथ घ्यावी असे सांगितले. एखाद्या अधिकाऱ्याविरोधात व्यापारी-उद्योजकांकडे तक्रार असेल तर त्यांनी कोल्हापूर चेंबरशी संपर्क साधावा. कोल्हापूर चेंबर संबंधित अधिकाऱ्याची सीबीआय व लाचलुचपत प्रतिबंधक शाखे मध्ये जावून त्यांना न्याय मिळवून देईल असेही सांगितले.
यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष राजू पाटील, भरत ओसवाल, मानद सचिव प्रशांत शिंदे, खजानिस विज्ञानंद मुंढे, संचालक संपत पाटील, संजय पाटील, प्रशांत पोकळे, धैर्यशील पाटील, संभाजीराव पोवार, अनिल धडाम, लक्ष्मण पटेल, विनोद पटेल, अविनाश नासिपुडे, राहुल नष्टे, रमेश कारवेकर, धर्मपाल जिरगे, प्रकाश केसरकर व विविध संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar