
मुंबई, 9 डिसेंबर (हिं.स.)। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रसारमाध्यमांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाशी संबंधित चिन्हे, इमारतींची दृश्ये किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या छायाचित्रांचा वापर केल्याची काही प्रकरणे दिसून आली आहेत. यातील संभ्रम दूर करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी प्रसारमाध्यमांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले की, संसदीय, विधानमंडळ तसेच राष्ट्रपती –उपराष्ट्रपती निवडणुका घेण्याची जबाबदारी भारत निवडणूक आयोगाची असून राज्यात या कामकाजासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. सध्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय अधिकारी एस. चोक्कलिंगम कार्यरत आहेत.
दुसरीकडे, संविधानातील अनुच्छेद 243के व 243झेडए नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अधीक्षण, संचालन, निर्देशन आणि नियंत्रणाची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे. महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयुक्त पदावर निवृत्त प्रधान सचिव दिनेश वाघमारे कार्यरत आहेत.
दोन्ही आयोगांची कार्यक्षेत्रे वेगवेगळी व स्वतंत्र असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह, अधिकारी, इमारती अथवा तत्सम दृश्यांचा वापर करणे चुकीचे असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
तसेच, राज्य निवडणूक आयोगाशी संबंधित बातम्यांमध्ये झालेल्या अशा चुकांची तातडीने दुरुस्ती करून संबंधित व्हिडिओ समाजमाध्यमांतून हटवावेत, असे आवाहनही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रसारमाध्यमांना करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule