
मुंबई, 9 डिसेंबर (हिं.स.)। गूगलने आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानात मोठे अपग्रेड करत जेमिनी 3 मधील ‘डीप थिंक’ हे नवे फिचर युजर्ससाठी रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. हे केवळ साधे अपडेट नसून, एआयला अधिक खोलवर विचार करण्याची क्षमता देणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. आतापर्यंत एआय बहुतांश वेळा प्रश्न विचारताच झटपट उत्तर देत असे, मात्र ‘डीप थिंक’ मोडमध्ये एआय आधी प्रश्नाची सखोल माहिती घेतो, त्याचे विविध पैलू तपासतो आणि त्यानंतर अधिक अचूक व विचारपूर्वक उत्तर देतो.
‘डीप थिंक’ मोड एआयला अधिक वेळ देतो, ज्यामुळे अवघड गणिती प्रश्न, लॉजिकल रीजनिंग, कोडिंग समस्या, तसेच प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजीसारख्या कामांमध्ये अधिक अचूक आणि सविस्तर उत्तरे मिळतात. हे फिचर विशेषतः विद्यार्थी, डेव्हलपर्स आणि प्रोफेशनल पातळीवर एआयचा वापर करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
सध्या हे फिचर गुगल एआय स्टुडिओ आणि जेमिनी अॅडव्हान्स्ड युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. म्हणजेच, हे सर्वसामान्य मोफत व्हर्जनमध्ये पूर्णपणे सुरू करण्यात आलेले नाही. हे वापरण्यासाठी युजर्सना जेमिनीचा हाय-टियर प्लॅन घ्यावा लागेल. यूजरने केवळ मोड सिलेक्शनमधून ‘डीप थिंक’ हा पर्याय ऑन केला की एआय अधिक खोलवर विचार करून उत्तर देतो.
साधारण जेमिनी आणि ‘डीप थिंक’ मोडमध्ये मोठा फरक आहे. सामान्य जेमिनी जलद उत्तर देतो, पण ‘डीप थिंक’ मोडमध्ये एआयची विचार करण्याची क्षमता अधिक खोलवर आहे. कठीण प्रश्न समजून घेण्याची क्षमता, लॉजिक आणि कोडिंगसारख्या कामांमध्ये हा मोड अधिक प्रभावी ठरतो. मात्र, अधिक प्रोसेसिंग होत असल्यामुळे उत्तर येण्यास थोडा अधिक वेळ लागू शकतो.
गूगलने या फिचरमध्ये सुरक्षिततेवरही भर दिला आहे. चुकीची माहिती, धोकादायक सूचना किंवा दिशाभूल करणारी उत्तरे टाळण्यासाठी यात अतिरिक्त सेफ्टी फिल्टर्स लावण्यात आले आहेत. यामुळे युजर्सना अधिक विश्वासार्ह आणि सुरक्षित उत्तरे मिळतील, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
या नव्या फिचरमुळे आता एआय केवळ प्रश्नाचे थेट उत्तर देणारा चॅटबॉट राहणार नसून, समस्या समजून घेणारा, त्यामागील लॉजिक ओळखणारा आणि विचारपूर्वक मार्गदर्शन करणारा ‘डिजिटल थिंकर’ म्हणून पुढे येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule