
पुणे, 9 डिसेंबर (हिं.स.)भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पुष्प विज्ञान संशोधन संचालनालयाचा (आईसीएआर–डीएफआर) १६ व्या स्थापना दिवसानिमित्त बुधवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी संबंधित क्षेत्रातील पाहुणे, शास्त्रज्ञ, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच शेतकरी सहभागी होणार आहेत. संस्थेचा हा स्थापना दिवस संशोधक, धोरणकर्ते, उद्योग व शेतकरी या सर्वांसाठी संवाद आणि सहकार्याचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून ओळखला जातो.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा सहभाग होणार आहेत.फुलशेती क्षेत्रात ज्ञानवृद्धी आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या आदान–प्रदानासाठी त्यांना ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे. कार्यक्रमात शेतकरी आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत वैज्ञानिक माहिती, आधुनिक तंत्रज्ञान व जबाबदार शेतीबद्दल जाणीव पोहोचविण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव यामध्ये केला जाईल. या दिवसानिमित्त “शेतीमध्ये कृषी रसायनांचा संतुलित वापर : पर्यावरण व शेत कामगारांची सुरक्षा” या विषयावर जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.ही कार्यशाळा नवी दिल्लीच्या क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने आयोजित केली आहे. या कार्यक्रमात दोनशेहून अधिक शेतकऱ्यांना ‘वनस्पती संरक्षण सुरक्षा किट’ वितरीत करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात “मसुदा बीज विधेयक २०२५: फुलशेती क्षेत्रासाठी संधी आणि परिणाम” या विषयावर विचारमंथन सत्र आयोजित केले आहे. यामध्ये नियम, धोरण बदल आणि फुलशेती व्यवसायासाठी असलेल्या संधींवर सखोल चर्चा होणार आहे. आयसीएआर डीएफआरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा समन्वय अधिकारी डॉ. डी. एम. फिरके यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु