
नाशिक, 9 डिसेंबर, (हिं.स.)। श्रीरामपूरहून नाशिककडे वाहनातून अवैधरित्या गोमांसाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा थरारक पाठलाग करून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सुमारे २०० किलो गोमांसासह वाहन पकडले असून, एक जण पसार झाला असून, एकाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर येथून इकोफोर्ड वाहनातून नाशिककडे गोमांस येणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार बजरंग दलाचे उपजिल्हाध्यक्ष सोनू नागरे, प्रमुख पदाधिकारी श्रीकांत क्षत्रिय, संग्राम फडके, नितीन पाटील, कुणाल जाधव, कृष्णा साखला, पिंटू सिसोदिया यांनी शिंदे टोल नाका येथे जाऊन सिन्नरकडून येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवले. व संशयित इकोफोर्ड वाहनाची प्रतिक्षा करू लागले. त्या दरम्यान एम.एच.१५ डी.एस. ७८४५ या क्रमांकाचे वाहन संशयास्पदरित्या सिन्नरहून
नाशिककडे येताना दिसले.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या वाहनाला शिंदे टोलनाका सोडल्यानंतर वाहनचालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र वाहनचालकाने त्याकडे दुर्लक्ष करून पळ काढला. सिन्नर फाटा, बिटको पॉइंट, नाशिकरोड व दत्तमंदिर सिग्नल परिसरात गर्दी असताना या वाहनचालकाने भरधाव वाहन चालवून स्वतः सह नागरिकांचा जीव धोक्यात घातला. अशा परिस्थितीत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या वाहनाचा थरारक पाठलाग करून ते अखेर उपनगर हद्दीतील जेतवननगरजवळील एका शाळेजवळ अडवण्यात यश मिळवले.
त्यावेळी कार्यकर्त्यांनी वाहनाची झडती घेतली असता एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. तर दुसऱ्याला ताब्यात घेतले आहे. या वाहनामध्ये सुमारे २०० किलो गोमांस असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यभरात गोमांसावर बंदी असताना सुद्धा अशा प्रकारची वाहतूक सुरू असल्यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गाडीतील गोमांस काढून ते नाशिक-पुणे महामार्गावर ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे नाशिकरोड ते नाशिक या मार्गावरील वाहतूक सुमारे अर्धातास खोळंबली होती. आंदोलनाची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, पोलीस निरीक्षक प्रभाकर सोनवणे आदींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस अधिकान्यांनी आंदोलकांची समजूत काढून त्यांना आंदोलन थांबवण्याची विनंती केली. त्यानुसार कार्यकत्यांनी आंदोलन थांबवले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV