
पुणे, 9 डिसेंबर (हिं.स.)उसाचा गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना आणि आठ दिवस झाले तरी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्याप ऊसदर जाहीर केलेला नाही.तरी उसाला पहिली उचल 3500 रुपये जाहीर करावी, विलंबाने दिलेल्या एफआरपी रकमेवर 15 टक्के व्याजाची आकारणी रक्कम मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर (भैय्या) देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पुणे साखर आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना मागण्यांचे निवेदन देऊन चार महिने झाले तरी साधे उत्तर ते देऊ शकत नसल्यामुळे त्यांनी सहकार मंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणीही त्यांनी केली. उसाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांत साखर आयुक्तांनी लक्ष घालावे, शेतकरी एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देत सोलापूरमधील शेतकऱ्यांनी साखर संकुलचा प्रवेशद्वार परिसर दणाणून सोडला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु