
सरकारचे निर्देश, उड्डाणांमध्ये कपात अनिवार्य
नवी दिल्ली, 09 डिसेंबर (हिं.स.) : इंडिगो एअरलाईन्सने आज, मंगळवारी सलग आठव्या दिवशी 60 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द केली असून त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सतत वाढणाऱ्या रद्द उड्डाणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इंडिगोला त्यांच्या उड्डाणांमध्ये तात्काळ कपात करण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशांना होणारा त्रास कमी करणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले. दरम्यान, इंडिगोने अद्याप उड्डाणे रद्द होण्याचे स्पष्ट कारण जाहीर केलेले नाही.
तब्बल एक आठवडा मोठ्या प्रमाणावर उड्डाणे बंद राहिल्यानंतर इंडिगोची सेवा हळूहळू सुरळीत होत असली तरी कंपनीने आज, मंगळवारी (9 डिसेंबर) 67 उड्डाणे रद्द केली आहेत. या यादीमध्ये चेन्नई, बेंगळुरू आणि तिरुअनंतपुरमसह विविध विमानतळांचा समावेश आहे. मागील सात दिवसांत इंडिगोने तब्बल 4500 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द केली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने इंडिगोचे काही स्लॉट कमी करून ते इतर एअरलाईन्सना देण्याचा निर्णय घेतला आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम आणि तमिळनाडूमध्येही अनेक उड्डाणे रद्द झाली आहेत. केवळ तमिळनाडूमधील 41 उड्डाणे आणि कर्नाटकातील बेंगळुरू विमानतळावरील 58 आगमन व 63 प्रस्थान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी संसदेत इंडिगोला कठोर शब्दात इशारा देत सांगितले की, संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असून भविष्यात अशा प्रकारची घटना टाळण्यासाठी सरकार कडक कारवाई करणार आहे. तसेच देशात किमान पाच मोठ्या एअरलाईन्सची गरज असल्याचे सांगत नव्या एअरलाईन्स सुरू करण्यासाठी सध्याचा काळ अत्यंत योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या इंडिगो देशात 2200 हून अधिक उड्डाणे चालवते, परंतु सरकारच्या निर्देशानुसार या संख्येत कपात होणार आहे. दरम्यान, इंडिगोने 1800 पेक्षा जास्त उड्डाणे पुन्हा सुरू केली असून कंपनीच्या मते त्यांच्या नेटवर्कची कार्यक्षमता 90 टक्क्यांहून अधिक प्रमाणात पूर्ववत झाली आहे. प्रवाशांना एकूण 827 कोटी रुपयांचे परतावे देण्यात आले असून 4500 हून अधिक हरवलेले सामानही परत करण्यात आले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी