
पुणे, 9 डिसेंबर (हिं.स.)। राज्यातील लहानग्या मुलींच्या आरोग्याचे संरक्षण आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्ह्यात ‘सर्व्हायकल कॅन्सर मुक्त महाराष्ट्र’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. महिलांच्या प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेप्रती राज्याची वचनबद्धता अधिक मजबूत करणारे हे एक निर्णायक पाऊल ठरत आहे.
भारतामध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून दर आठ मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू होत आहे. दररोज सुमारे २०० महिलांचे प्राण घेणारा हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक सामान्य कर्करोग आहे. परंतु नियमित तपासणी, योग्य वेळी लसीकरण आणि पॉझिटिव्ह रुग्णांचे उपचार केल्यास हा कर्करोग पूर्णपणे टाळता येऊ शकतो, यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेली ही मोहीम ९ ते १४ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये लवकर जागृती, प्रतिबंध आणि एचपीव्ही लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राबवित आहे. कुटुंबांना योग्य माहिती उपलब्ध करून देत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट या मोहिमेमार्फत साध्य केले जात आहे.
राज्य शासनाने जीविका फाउंडेशनची (जीविका हेल्थकेअर) अंमलबजावणी भागीदार म्हणून नियुक्ती केली असून, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद पुणे आणि आरोग्य विभाग यांच्यासह समन्वय साधून जागृती, पालक सहभाग आणि कार्यक्रमाची सुटसुटीत अंमलबजावणी करण्यात संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तसेच जीविका फाउंडेशन विविध कॉर्पोरेट संस्थांशी CSR च्या माध्यमातून भागीदारी करून उपक्रमाला गती देत आहे.
पुणे जिल्ह्यात ZS – ग्लोबल मॅनेजमेंट अँड कन्सल्टिंग फर्म, आयसर्टिस, कॅरॅटलैन, ब्रिजनेक्स्ट इंडिया प्रा. लि., जेबीएम ऑटो आदी संस्थांच्या CSR सहाय्यामुळे आतापर्यंत ६००० हून अधिक मुलींना एचपीव्ही लसीकरणाद्वारे सुरक्षित करण्यात आले आहे. तसेच बजाज फिनसर्व आणि ZS यांच्या सहकार्याने आणखी ५,००० लाभार्थींना संरक्षण देण्याचे नियोजन आहे.
देशातील महिलांच्या प्रतिबंधात्मक आरोग्यावर केंद्रित असलेल्या सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य उपक्रमांपैकी हा उपक्रम ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शाळांमध्ये शिक्षक व स्थानिक नेतृत्वाच्या सहभागाने जागृती सत्रे व लसीकरण मोहिमा घेण्यात येणार असून, विद्यार्थिनी व पालकांमध्ये लसीबद्दल विश्वास निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सर्व्हायकल कॅन्सर मुक्त महाराष्ट्र मोहीम ही राज्यातील प्रत्येक मुलीपर्यंत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. आपल्या मुलींचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असून, राज्याच्या आरोग्यदायी भविष्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राने CSR च्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदवावा.”
भक्कम नेतृत्व, समर्पित भागीदारी आणि समाजाच्या सक्रीय सहभागामुळे पुणे जिल्हा हा तरुण पिढीसाठी अधिक निरोगी, सशक्त आणि ‘सर्व्हायकल कॅन्सर मुक्त’ भविष्य घडविण्याच्या महाराष्ट्राच्या सामूहिक संकल्पाचे प्रतीक बनत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु