
मुंबई, 9 डिसेंबर, (हिं.स.)। श्रमिक, कष्टकरी, वंचित, दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी आयुष्य वेचणाऱ्या एका संघर्षयोद्ध्याला आज महाराष्ट्र मुकला आहे. सामाजिक तळमळ आणि प्रामाणिकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दांत राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
डॉ. आढाव यांचे सोमवारी वयाच्या ९५व्या वर्षी पुण्यात निधन झाले. हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कागद-काचा वेचणाऱ्यांची संघटना अशा विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांनी हजारो कष्टकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला. ‘एक गाव एक पाणवठा’ ही चळवळ त्यांनी उभी केली. सत्यशोधक चळवळीचा विचार त्यांनी आयुष्यभर जपला. त्यांचा आशावाद, परखड विचार, निःस्वार्थी वृत्ती आणि जनतेशी जोडलेली नाळ हे त्यांच्या सामाजिक चळवळीचे बळ होते. आढाव यांच्या जाण्याने महाराष्ट्रातल्या प्रगत, विचारशील चळवळीचे आतोनात नुकसान झाले आहे, असेही झिरवाळ म्हणाले.
वंचित आणि असंघटित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. आधारस्तंभ म्हणून काम केले. सामाजिक कुप्रथांविरोधात त्यांनी दिलेला लढा कायम स्मरणात राहील. महाराष्ट्राला लाभलेल्या समाजसेवकांची एक थोर परंपरेतले एक मौलिक व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले आहे. डॉ. बाबा आढाव यांच्या आप्तस्वकियांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असेही झिरवाळ यांनी म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर