मलेरीया / डेंग्यू नियंत्रणासाठी नागरिकांचा सहभाग वाढीकरीता जाहीर शिबीरांचे आयोजन
नवी मुंबई, 12 जून (हिं.स.)। सद्यस्थितीत ये-जा करणा-या पावसामुळे हिवताप / डेंग्यूसारखे रोग पसरविणऱ्या डासांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. हिवताप / डेंग्यूसारखे रोग पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती मुख्यत्वे घरांतर्गत व घराभोवताली असलेल्या स्वच्छ साचलेल
मलेरीया / डेंग्यू नियंत्रणासाठी नागरिकांचा सहभाग वाढीकरीता जाहीर शिबीरांचे आयोजन


नवी मुंबई, 12 जून (हिं.स.)।

सद्यस्थितीत ये-जा करणा-या पावसामुळे हिवताप / डेंग्यूसारखे रोग पसरविणऱ्या डासांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. हिवताप / डेंग्यूसारखे रोग पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती मुख्यत्वे घरांतर्गत व घराभोवताली असलेल्या स्वच्छ साचलेल्या पाण्यामधील डासउत्पत्ती स्थानांमध्ये होत असते, यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करुन त्यादृष्टीने त्यांना जागरीक करून त्यांचा याकामी सक्रीय सहभाग घेण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात मलेरीया / डेंग्यू नियंत्रक विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात येत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नियमित कार्यवाही –

डासांनी अंडी घातल्यापासुन डास जन्म घेईपर्यंत 8-10 दिवसांचा कालावधी लागतो. हे चक्र मध्येच तोडण्यासाठी व डासउत्पत्ती नियंत्रणात आणण्यासाठी साप्ताहिक कार्यक्रम राबविण्यात येतो....

• महानगरपालिकेमार्फत साप्ताहिक वेळापत्रकानुसार डास/अळी नाशक फवारणी कार्यक्रम.

• साप्ताहिक वेळापत्रकानुसार बंद गटारात रासायनिक धूरीकरण कार्यक्रम.

• घरांतर्गत डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविण्यात येते, त्यामध्ये डासअळ्या आढळल्यास त्या अळ्या नागरिकांना दाखवून, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते.

• प्रत्येक हिवताप / डेंग्यू रुग्णाच्या सभोवतालच्या 100 घरांमध्ये डासअळ्या शोधणे, पावडर फवारणी करणे, तापाच्या रुग्णांचा सर्वेक्षण करुन रक्त नमुने घेणे इ. कार्यवाही करण्यात येते.

• आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत कार्यक्षेत्रात गृहभेटी देऊन, तापाच्या प्रत्येक रुग्णाचा रक्तनमुना घेऊन मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार देण्यात येतो.

• महानगरपालिकेच्या रुग्णालयात किंवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रत्येक तापाचा रुग्णाचा रक्तनमुना घेऊन उपचार देण्यात येतो.

• महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रांतर्गत विविध ठिकाणी पावसाळा कालावधीत प्रत्येक आठवड्याला 1 दिवस विशेष हिवताप / डेंग्यू जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे.

हिवताप / डेंग्यूची आकडेवारी

• सद्यस्थितीत नमुंमपा कार्यक्षेत्रामध्ये हिवताप व डेंग्यू रुग्णसंख्या खालील प्रमाणे आहे.

1 जानेवारी 2025 ते 6 जून 2025 या कालावधीत - 68106 घेतलेले रक्तनमुने - 11 हिवताप दूषित रूग्ण - 111 संशयित डेंग्यू - 40 एन आय व्ही पुणे / सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविण्यात आलेले रक्तजल नमुने - दूषित डेंग्यू रूग्ण नाही.

156 एकूण शिबिर संख्या - 56355 नागरिकांनी शिबिरास भेट दिली - 3945 रक्तनमुने घेतले.

नागरिकांकडून अपेक्षा –

• पाणी साठवून ठेवलेल्या उघड्या ड्रमवर कपडा / ओढणी इ. वापर करुन ते झाकून ठेवणे.

• गॅलेरीत / गच्चीवरील, घराच्या परिसरात भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंट्या, रंगाचे डबे, उधड्यावरील टायर्स इत्यादी नष्ट करणे.

• कुंडीखालील ट्रे काढून टाकणे अथवा उलटे करुन ठेवणे.

• फुलदाण्या, ट्रे, फेंगशुई यामध्ये साचलेले पाणी आठवड्यातुन एकदा बदलणे.

• घरामधील व घराबाहेरील पाणी साठविण्याचे ड्रम/टाक्या/ भांडी आठवडयातून एकदा काढून पुर्णपणे कोरडे करणे.

• आपले घर, कार्यालय, व परिसरात पाणी साचू न देणे.

• सर्व पाण्यांच्या टाक्यांना झाकणे लावून बंदिस्त करणे.

• शक्य झाल्यास डास प्रतिबंधात्मक मच्छरदाणीचा वापर करणे.

• आपल्या घरी येणा-या आरोग्य कर्मचा-यांमार्फत व महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये/ दवाखान्यांमध्ये तापाच्या रुग्णाची मोफत रक्त तपासणी करुन घेणे.

• ताप आल्यास वैद्यकिय सल्ल्याने उपचार घेणे.

नमुंमपा आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. त्या कार्यवाही सोबतच नवी मुंबईकर नागरिकांनी घरातील व घराभोवतालची डासउत्पत्ती स्थाने नष्ट करणे तसेच आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे, आजुबाजूचा परिसर / टेरेसवरील भंगार नष्ट करणे आदी बाबींवर लक्ष दिले तर नवी मुंबईत हिवताप / डेंग्यू आजारावर आळा घालणे शक्य होईल. तरी सर्व नागरिकांनी जागरूकतेने सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande