मुंबई, 6 ऑगस्ट (हिं.स.) - विश्वामित्री नदीवरील पूल, वडोदरा जिल्हा, गुजरात येथे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पूर्ण झाला आहे. या प्रकल्पासाठी गुजरातमध्ये नियोजित 21 नदी पूलांपैकी हा सतरावा पूल पूर्ण झाला आहे.
80 मीटर लांब असलेला हा पूल पश्चिम रेल्वेच्या वडोदरा-सुरत मुख्य मार्गालगत बांधण्यात आला आहे. या पुलामध्ये तीन खांब आहेत, यापैकी एक नदीच्या प्रवाहात तर उर्वरित दोन नदीच्या काठावर (प्रत्येक बाजूस एक) स्थित आहेत.
वडोदऱ्याच्या शहरी परिसरातून जात असलेला हा पूल वडोदरा जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाचा पायाभूत घटक म्हणून कार्य करतो. वडोदरा हे सर्वाधिक वर्दळीचे शहरी केंद्रांपैकी एक आहे, आणि शहरातून जाणारा पूल बांधणे हे एक अत्यंत काटेकोर नियोजन, वडोदरा महानगरपालिका व इतर स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे, या साऱ्याची मागणी करणारे काम होते.
बुलेट ट्रेनचा मार्ग वडोदरा शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात विश्वामित्री नदीला 9 वेगवेगळ्या ठिकाणी ओलांडतो किंवा तिच्या प्रवाहात वळसा घालतो. मुख्य नदी पुलाव्यतिरिक्त, उर्वरित 8 ओलांड्यांपैकी 3 ओलांड्यांचे काम आधीच पूर्ण झाले आहे, तर इतर ठिकाणी सध्या बांधकामाचे काम सुरू आहे.
नदी पुलाच्या ठळक वैशिष्ट्ये
● लांबी: 80 मीटर
● यात प्रत्येकी ४० मीटरचे दोन स्पॅन आहेत, जे एसबीएस (स्पॅन बाय स्पॅन) पद्धतीने बांधले आहेत.
● पायाभूत स्तंभांची उंची – 26 ते 29.5 मीटर
● 5.5 मीटर व्यासाचे तीन वर्तुळाकार पायाभूत स्तंभांचा समावेश
● प्रत्येक पायाभूत स्तंभ 1.8 मीटर व्यासाच्या आणि कमाल 53 मीटर लांबीच्या 12 पाइल्सवर आधारलेला आहे
● ही नदी वडोदरा बुलेट ट्रेन स्थानकापासून सुमारे 3 किमी अंतरावर आहे.
● वडोदरा जिल्ह्यात पूर्ण झालेला आणखी एक नदी पूल धधार नदीवर आहे (120 मीटर)
अतिरिक्त माहिती
एमएएचएसआर मार्गामध्ये एकूण 25 नदी पूल आहेत, त्यापैकी 21 गुजरातमध्ये आणि 4 महाराष्ट्रात आहेत.
गुजरातमध्ये नियोजित 21 नदी पुलांपैकी 17 पूल खालील नद्यांवर पूर्ण झाले आहेत: पर (वळसाड जिल्हा), पूर्णा (नवसारी जिल्हा), मिंढोळा (नवसारी जिल्हा), अंबिका (नवसारी जिल्हा), औरंगा (वळसाड जिल्हा), वेगणिया (नवसारी जिल्हा), मोहर (खेडा जिल्हा), धधार (वडोदरा जिल्हा), कोळाक (वळसाड जिल्हा), वात्रक (खेडा जिल्हा), कावेरी (नवसारी जिल्हा), खरेरा (नवसारी जिल्हा), मेष्वा (खेडा जिल्हा), किम (सुरत जिल्हा), दरोथा (वळसाड जिल्हा), दमनगंगा (वळसाड जिल्हा) आणि विश्वामित्री (वडोदरा जिल्हा).
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी