नवी दिल्ली, 6 ऑगस्ट (हिं.स.) - नवी दिल्ली दौऱ्यावर असताना आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.
उपमुख्यमंत्री शिंदे हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे आले असता त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी मोदीजीना शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले, तसेच मोदीजीच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यदलांनी आधी 'ऑपरेशन सिन्दुर' आणि आता 'ऑपरेशन महादेव' यशस्वी करून पहलगाम हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याबद्दल त्यांना शिवशंकराची प्रतिमा भेट म्हणून दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात केंद्र आणि राज्य शासनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. तसेच शिवसेना - भाजप युती ही एनडीए अस्तित्वात येण्यापूर्वीपासूनची असून आता या युतीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना एनडीए उमेदवाराला पूर्णपणे समर्थन देईल असेही त्यांनी या भेटीत पंतप्रधानाना सांगितले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिंदे यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, सून सौ. वृषाली श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी