परभणी, 6 ऑगस्ट (हिं.स.) : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) श्री. प्रदीप कामले यांनी परभणी ते नगरसोल दरम्यान रेल्वे सेक्शनची सखोल पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी मानवत, सेलू, परतूर, रोटेगाव आणि नगरसोल येथील अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रगती तपासली.
अमृत भारत स्टेशन योजना ही प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्या दृष्टीने महत्वाची असून, स्थानकांचे आधुनिकीकरण, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि प्रवासी अनुभवात सुधारणा करण्यासाठी हे कार्य हाती घेण्यात आले आहे.
याशिवाय, डीआरएम कामले यांनी सुरक्षितता वाढवण्यासाठी प्रस्तावित रोड अंडर ब्रिज (RUB) संदर्भात विविध लेव्हल क्रॉसिंग्सची पाहणी केली. त्यामध्ये बदनापूर-करमाड दरम्यान किमी 151/4-5 वर एल.सी. क्र. 68, दौलताबाद-पोटुल दरम्यान किमी 97/2-3 वर एल.सी. क्र. 42, दौलताबाद-पोटुल दरम्यान किमी 96/0-95/9 वर एल.सी. क्र. 41, परसोडा-रोटेगाव दरम्यान किमी 63/4-5 वर एल.सी. क्र. 27, तारूर-नगरसोल दरम्यान किमी 37/6-7 वर एल.सी. क्र. 16 याची पाहणी केली.
यावेळी कामले यांनी सांगितले की, अमृत भारत स्टेशन योजनेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ व आरामदायक होईल. तसेच, आरयूबीसारख्या पायाभूत सुविधांमुळे रेल्वे क्रॉसिंगवरील अपघाताचा धोका कमी होईल आणि रेल्वेची सुरक्षितता व कार्यक्षमता वाढेल.
या दौऱ्यादरम्यान त्यांनी परभणी ते नगरसोल दरम्यान मागील खिडकीतून (Rear Window) रेल्वे पटरी, सिग्नल यंत्रणा, लेव्हल क्रॉसिंग आणि संरक्षक यंत्रणांची पाहणी केली. ही तपासणी रेल्वेच्या सुरक्षा आणि कार्यक्षमता उन्नतीसाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पाहणीवेळी अभियांत्रिकी, वाणिज्य, सिग्नल आणि टेलिकॉम, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल व गतीशक्ती विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. श्री. कामले यांनी सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis