रत्नागिरी : ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी
रत्नागिरी, 6 ऑगस्ट, (हिं. स.) : ''खालिद का शिवाजी'' या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील खोटी व तथ्यहीन माहिती देऊन समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी हिंदू जनजागृती समिती
‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारे निवेदन


रत्नागिरी, 6 ऑगस्ट, (हिं. स.) : 'खालिद का शिवाजी' या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील खोटी व तथ्यहीन माहिती देऊन समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तसेच जिल्हाधिकारी यांच्या नावे रत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना हे निवेदन देण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५ टक्के मुस्लिम होते, महाराजांचे ११ अंगरक्षक मुस्लिम होते, तसेच रायगडावर महाराजांनी मशीद उभारली होती, असे ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटात स्पष्टपणे दाखवलेले आहे; मात्र चित्रपटात केलेले हे सर्व दावे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे, तथ्यहीन आणि मूळ ऐतिहासिक नोंदींशी विसंगत असून, हे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना 'धर्मनिरपेक्ष' (सेक्युलर) दाखवण्याच्या हेतुपुरस्सर प्रयत्नाचे उदाहरण आहे. कोणत्याही अधिकृत बखरींमध्ये, ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये, पेशवाई, इंग्रज वा मुघल काळातील अभिलेखांमध्ये या गोष्टींचा उल्लेख नाही. अशा खोट्या व भ्रामक माहितीच्या आधारे चित्रपट प्रदर्शित करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि इतिहासाचा अपमान आहे. त्यामुळे या चित्रपटावर तत्काळ बंदी आणली पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा कोट्यवधी जनतेच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे त्याचे विकृतीकरण करणे हे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरू शकते. तसेच, सामाजिक तणाव आणि जनक्षोभ निर्माण होण्याचा संभव आहे. याची शासनाने वेळीच दाखल घ्यावी, असे या निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे.

निवेदन देताना राजेंद्र सावंत, शशिकांत जाधव, देवेंद्र झापडेकर, अमितराज खटावकर, शैलेश बेर्डे, अरविंद बारस्कर, प्रकाश सावंत, गोविंद भारद्वाज, संजय जोशी, बंडू चेचरे, विष्णू बगाडे आदी उपस्थित होते.

हिंदू जनजागृती समिती आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थांच्या कार्यकर्त्यांनी शहरातील सिटी प्राइड सिनेमागृहात जाऊन व्यवस्थापकांची भेट घेतली. हिंदुत्वनिष्ठांच्या भावना सिनेमागृहाच्या मालकांपर्यंत पोहोचवाव्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास प्रदर्शित करणारा 'खालिद का शिवाजी' हा चित्रपट प्रदर्शित करू नये, अशी विनंती त्यांना करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande