परभणी : दहिहंडीला अभिनेत्री अमृता खानविलकर उपस्थित राहणार
परभणी, 6 ऑगस्ट (हिं.स.)। परभणी शहरातील राजे संभाजी मित्र मंडळाच्यावतीने आयोजित माखनचोर दहीहंडी फोड स्पर्धा यंदा दि. १८ ऑगस्ट रोजी मोठ्या जल्लोषात पार पडणार असून यंदाचे हे २३ वे वर्ष आहे. सलग २२ वर्षे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत असून, यावर्षीचे मु
अमृता खानविलकर यांची उपस्थिती ठरणार दहीहंडीच्या दिवशी


परभणी, 6 ऑगस्ट (हिं.स.)। परभणी शहरातील राजे संभाजी मित्र मंडळाच्यावतीने आयोजित माखनचोर दहीहंडी फोड स्पर्धा यंदा दि. १८ ऑगस्ट रोजी मोठ्या जल्लोषात पार पडणार असून यंदाचे हे २३ वे वर्ष आहे. सलग २२ वर्षे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत असून, यावर्षीचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर असणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला विशेष रंगत येणार असून, प्रेक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भव्य स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्पर्धा परभणीतील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर पार पडणार असून, यासाठी सर्व आवश्यक तयारी करण्यात आली आहे. दहीहंडी फोडण्यासाठी विविध नामवंत गोविंदा पथकांनी तयारी सुरू केली आहे. स्पर्धेचे परीक्षण प्रशिक्षित पंच करणार असून, महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची आणि सुरक्षिततेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस १ लाख ११ हजार १११ रुपये रोख ठेवण्यात आले आहे. द्वितीय क्रमांकासाठी ७१ हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय दोन उत्तेजनार्थ बक्षिसांचीही घोषणा आयोजक मंडळाकडून करण्यात आली आहे. या स्पर्धेचा उद्देश सामाजिक एकोपा, उत्सवप्रियता आणि परंपरेचा गौरव राखणे असा असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. परभणीकरांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेला उपस्थित राहून दहीहंडीचा थरार अनुभवावा आणि अमृता खानविलकर यांची झलक पाहण्याची संधी सोडू नये, असे आवाहन राजे संभाजी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार संजय जाधव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande