रायगड, 18 सप्टेंबर, (हिं.स.)। आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाच्या 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' अंतर्गत ‘आदि कर्मयोगी – उत्तरदायी शासन’ या राष्ट्रीय स्तरावरील अभियानाचा शुभारंभ रायगड जिल्ह्यात उत्साहात झाला. १७ सप्टेंबर रोजी खालापूर तालुक्यातील कलोते-विनेगाव (कातळाची वाडी) आणि माणगाव तालुक्यातील तासगाव आदिवासी वाडी येथे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी जावळे यांनी धरती आबा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दाखले प्रदान केले. ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे, त्यांना सक्षम व आत्मनिर्भर बनवणे, तसेच गावांचा सर्वांगीण विकास साधणे हा आहे, असे जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी सांगितले. त्यांनी ग्रामस्थांना विकासप्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही केले.
कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, तहसीलदार श्री. काळे, गटविकास अधिकारी शुभदा पाटील, खालापूर तहसीलदार अभय चव्हाण, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ब्लॉक मास्टर ट्रेनर्स आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील ११३ आदिवासी गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून, या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांची सेवा समन्वयितपणे पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे. या उपक्रमामुळे आदिवासी पाड्यांमध्ये विकासाची नवी पहाट उगवली असून, गावकऱ्यांमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी केले. तर सहायक प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी गाव विकास आराखडा कसा तयार करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, तहसीलदार श्री. काळे, गटविकास अधिकारी शुभदा पाटील, खालापूर तहसीलदार अभय चव्हाण, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ब्लॉक मास्टर ट्रेनर्स आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके