राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, जयंत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सांगली, 18 सप्टेंबर (हिं.स.) - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे तब्बल ३० जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके, घरे, जनावरे, गोठे पाण्याखाली गेले असून शेतकरी संकटात सापडले आहेत. बळीराजा इतक्या अडचणीत असताना या सरकारच्या हृदयाला पाझर
राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, जयंत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


सांगली, 18 सप्टेंबर (हिं.स.) - राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे तब्बल ३० जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके, घरे, जनावरे, गोठे पाण्याखाली गेले असून शेतकरी संकटात सापडले आहेत. बळीराजा इतक्या अडचणीत असताना या सरकारच्या हृदयाला पाझर कसा फुटत नाही? असा प्रश्न उपस्थित करत असतानाच सरकारने राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जारी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंतराव पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली.

पत्रात ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील म्हणाले की, राज्यात पावसाचे थैमान चालू असून गेल्या दोन महिन्यांत अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील तब्बल ३० जिल्ह्यांतील तब्बल १७ लाख ८५ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर येऊन शेतीचे आणि ओढ्यालगत असलेल्या घरांचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पुर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. पावसामुळे शेतातील माती वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे.

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कार्यपध्दतीमुळे पंचनामे वेळेत होत नसून त्याची माहिती सर्व शेतकऱ्यांना दिली जात नाही. पंचनामे झाले तरी वास्तव नुकसानाचे योग्य मुल्यमापन होत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात तीव्र संताप निर्माण झाला आहे. पाऊस सर्वत्र पडलेला असल्यामुळे नुकसानही सर्वच शेतकऱ्यांचे झाले आहे. बँकांचे हप्ते कसे फेडायचे, मुलांचे शिक्षण कसे करायचे असे प्रश्न पिडीत शेतकरी करत आहेत.

त्यामुळे पीकविमा कंपन्यांवर दबाव आणून शेतकऱ्यांना तातडीने विमा दावे अदा करण्याचे आदेश द्यावेत. बँकाकडून होत असलेली वसुलीची कार्यवाही तात्काळ थांबवावी. शेतकऱ्यांसाठी अतिरीक्त बियाणे व खतांचा पुरवठा उपलब्ध करुन द्यावा.

तरी, सरकारने पंचनाम्याच्या नावाखाली वेळकाढूपणा थांबवावा आणि शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी. केवळ पीक नुकसान नव्हे तर जनावरांचे, घरांचे व गोठ्यांचे नुकसान यासाठीही मदत जाहीर केली जावी, ही विनंती.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande