गडचिरोली - भोंगळ कारभाराविरोधात आ. डॉ. मिलिंद नरोटे यांची कार्यालयात धडक
गडचिरोली, 18 सप्टेंबर, (हिं.स.) गडचिरोली जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गचे निकृष्ट काम, त्यातील चुकीचे नियोजन आणि अधिकाऱ्यांची मनमानी यामुळे गुरुवारी गडचिरोलीत धानोरा, चामोर्शी तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाला आ. डॉ मिलिंद नरोटे यांची भेट


गडचिरोली, 18 सप्टेंबर, (हिं.स.) गडचिरोली जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गचे निकृष्ट काम, त्यातील चुकीचे नियोजन आणि अधिकाऱ्यांची मनमानी यामुळे गुरुवारी गडचिरोलीत धानोरा, चामोर्शी तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाला भेट दिली असता कुणीही अधिकारी उपस्थित नव्हते. यामुळे संतापलेल्या आमदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

काही दिवसांपूर्वी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गडचिरोली जिल्‌ह्यात १० ते १५ हजार कोटींचे राष्ट्रीय महामार्गचे काम सुरु असल्याचे सांगितले होते. अनेकदा भाषणातूनही ते गडचिरोलीतील रस्त्यांबद्दल दावे करत असतात. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असून या महामार्गांमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. जे महामार्ग निर्माण करण्यात आले, त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येते. यावरील पुलाचे बांधकाम अर्धवट आहे. तर छत्तीसगडला जोडणाऱ्या मार्गाचे काम सुरु असून चुकीच्या नियोजनामुळे या मार्गांवर दररोज अपघात होत असतात. अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने गंभीर आजारी रुग्ण आणि विध्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

यावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन, तक्रारी देऊनही साधी दखल घेतली जात नाही. त्यामुळे त्रस्त भाजप पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात धडक दिली. मात्र, कार्यालयात कुणीही अधिकारी उपस्थित नव्हता.

यावेळी संतापलेल्या आमदारांनी फोनवरून अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. विशेष म्हणजे या कार्यालयात कायम अधिकारी गैरहजर असतात. त्यांच्या दौऱ्यांची नोंद नसते. लोकप्रतिनिधीना कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसगडे, अनिल पोहनकर, दत्तू सूत्रपवार, अनिल तिडके यांच्यासह गडचिरोली विधानसभेतील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

....तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार

मागील काही महिन्यांपासून चामोर्शी, धानोरा राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भात तक्रारीचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतरही ते चालढकल भूमिका घेतात. दुसरीकडे अपघात, वाहतूककोंडीमुळे सामान्य जनता त्रस्त आहे. अनेकांना अपघातात जीव गमवावा लागतो आहे. इतके गंभीर प्रश्न समोर असतात प्राधिकरणचे अधिकारी उपलब्ध नसतात. लोकप्रतिनिधींची दिशाभूल करतात. राष्ट्रीय महामार्गाच्या समस्या सात दिवसात न सोडविल्यास प्राधिकरणच्या सर्व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार, असा निर्वाणीचा इशारा आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande