
जळगाव , 12 मार्च (हिं.स.) : वर्धा येथील माहेर असलेल्या एका मुलीचा विवाह जळगाव शहरातील मनुदेवी नगर येथे असलेल्या वरासोबत निश्चित झाला. ठरल्यानुसार नवरदेवाची मिरवणूक निघाली. वऱ्हाडी वरातीत थिरकण्यात व्यस्त असतानाच ‘चाईल्ड हेल्पलाईन’ला मुलगी अल्पवयीन असल्याचा फोन आल्यामुळे महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांचा ताफा नवरदेवाच्या घोड्यासमोर उभा ठाकला. एका अल्पवयीन मुलीशी लग्न करत असल्याची जाणीव नवरदेवाला करून देत घोड्यावर असलेल्या नवरदेवाला ताब्यात घेत हा विवाह रोखण्यात आला.
जळगाव शहरात एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका युवकाचा विवाह वर्धा येथील मुलीसोबत निश्चीत करण्यात आला. त्यानुसार जागतिक महिला दिन मुहूर्त वधु वर पक्षांकडून घेण्यात आला. त्यानुसार तयारीही सुरू झाली. नवरदेवाकडच्या मंडळीने वधूपक्षाचे जल्लोषात स्वागतही करणे आदी कार्यक्रम पार पडले. मांडवात हळद लागत्यानंतर सहजीवनाची गाठ बांधत अक्षता पडण्याचा मुहूर्त जवळ आलेला.त्याचवेळी ‘चाईल्ड हेल्पलाईन’ला विवाह होणारी मुलगी अल्पवयीन असून तीचा विवाहाची माहिती मिळाली. त्यानुसार ‘चाईल्ड हेल्पलाईन’ वे समन्वयक कुणाल शुक्त, निरीक्षक निलेश चौधरी, केस वर्कर प्रसन्न बागल आदी विवाह स्थळाचा पत्ता व नियोजीत वराचा शोध घेत निघाले. विवाहस्थळाच्या ठिकाणी शहरातील मनुदेवीनगर परिसरात जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने प्रशासन अधिकाऱ्यांचा ताफा वरातीत शिरला.
दरम्यान, मांडवात ताफा सजून असलेल्या नवरदेवाला घोडयावर असतानाच अल्पवयीन वधू सोबत विवाह करीत असल्याची जाणीव करून देण्यात आली. वरातीतील घोड्यावर बसलेल्या नवरदेवाला तत्काळ घोड्यावरून खाली उतरवित ताब्यात घेत तसेच अल्पवयीन नवरीसह तिच्या पालकांना ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. आणि त्यानंतर उपवर-वधूसह यांचा दोघांकडील परिवार एम आयडीसी पोलिसात दाखल झाला.पोलिस व महिला बाल कल्याण समितीच्यावतीने अल्पवयीन वधूचे वय १७ वर्ष ६ महिने असल्याचे समजपत्र दिल्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने नियोजित वधूला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यामुळे ती १८ वर्षांची पूर्ण झाल्यानंतरच विवाह करू असे वधूच्या पालकांकडून लिहून घेण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर