
लातूर, 12 मार्च, (हिं.स.) - देवणी तालुक्यातील नागराळ गावातील श्री गुरुलिंगेश्वर मठ संस्थान येथे मठाच्या जीर्णोद्धार व नव्या बांधकामाच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा सोमवार, दि. १६ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. धार्मिक वातावरणात हा सोहळा पार पडणार असून परिसरातील भाविकांसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.
या कार्यक्रमास श्री श्री श्री १००८ सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी (उज्जैनी महापीठ) यांचे दिव्य सान्निध्य लाभणार आहे. त्यांच्या शुभहस्ते मठाच्या जीर्णोद्धार व भूमिपूजन सोहळ्याची सुरुवात होणार असून या कार्यक्रमासाठी विविध ठिकाणांहून शिवाचार्य महाराज, संत-महंत तसेच धर्मगुरू उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या नियोजनानुसार सकाळी १० वाजता उज्जैनी गुरुपीठाच्या गादीवरील परंपरागत विधीने भूमिपूजन सोहळा होईल. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता धर्मसभा आयोजित करण्यात आली आहे. या धर्मसभेत विविध शिवाचार्य महाराजांकडून धर्म, संस्कृती आणि समाजहिताच्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. दुपारी १ वाजता उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असून अध्यक्षस्थानी डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज (उदगीर) असतील. तसेच नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज (सोनपेठ), डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज (मुखेड), चंद्रशेखर शिवाचार्य महाराज (आळमल), अमृतेश्वर शिवाचार्य महाराज (जिंतूर) तसेच परमहंस ह.भ.प. गहिनीनाथ महाराज (ओसेकर) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सोहळ्याच्या निमित्ताने रविवारी सायंकाळी शिव कीर्तन सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले असून यामध्ये शिवशरण गुरूजी रटकलकर (हिंगोली) यांचे कीर्तन होणार आहे. तसेच परिसरातील विविध गावांतील भजनी मंडळेही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नागराळ, देवणी तसेच आसपासच्या गावांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन नियोजित वीरशैव विश्वस्त समिती, नागराळ तसेच समस्त सद्भक्त मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे. या भव्य धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis