शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर हाच समृद्धीचा मार्ग - आयुष प्रसाद
नाशिक, 12 मार्च, (हिं.स.)। प्रत्येक शेतकरी, शेतमजुराचे उत्पन वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतीतील उत्पन्न आणि उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा. तंत्रज्ञानाचा वापर हाच शेतकऱ्यांचा समृद्धीचा मार
Greater use of new technologies


नाशिक, 12 मार्च, (हिं.स.)। प्रत्येक शेतकरी, शेतमजुराचे उत्पन वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतीतील उत्पन्न आणि उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा. तंत्रज्ञानाचा वापर हाच शेतकऱ्यांचा समृद्धीचा मार्ग आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

जिल्हा विकास आराखडा नाशिक फेस्टिव्हल अंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा नियोजन समिती, कृषी विभाग, ‘आत्मा’ आणि माविमच्या संयुक्त विद्यमाने कृषी कुंभ 2026 चे आयोजन आजपासून यूथ फेस्टिवल मैदानावर सुरू झाले. त्याच्या उद्घाटप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. प्रसाद बोलत होते. कृषी कुंभचे उद्घाटन राज्य शासनाचे कृषी पुरस्कार प्राप्त महिला शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण (मालेगाव), हेमांगी पाटील (नाशिक), द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, 'आत्मा'चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, कृषी पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी मेधा बोरसे, विमलताई आचारी, सुनीता खेमनार, श्रद्धा कासार्डे, संगीता सांगळे, पूनम डोखळे, लक्ष्मी मोरे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे यांनीही कृषीकुंभ प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केली.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून कृषी कुंभचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी कुंभात जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतकरी भेट देतील, असे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी काश्मीरपासून ते केरळपर्यंतच्या भागातील प्रगतीशील शेतकरी, तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी कृषी कुंभमध्ये मिळालेली माहिती आपापल्या गावातील शेतकऱ्यांना द्यावी. तसे झाल्यास कृषी कुंभमध्ये मिळालेल्या माहितीचे सकारात्मक परिणाम आगामी खरीप हंगामात दिसून येण्यास मदत होईल.

कृषी कुंभमध्ये कृषी विभागाशी निगडित एकूण १६ विभागांचे सुमारे चारशेवर स्टॉल मांडण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी लागवड, मशागत, मळणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याचीही माहिती घेत शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञनाचा वापर करावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. माने यांनी प्रास्ताविकात महोत्सवाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र संघाने यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष घोषित केले आहे. त्यामुळे कृषी कुंभचे उदघाटन जिल्ह्यातील कृषी पुरस्कार प्राप्त महिला शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. काशिद यांनी आभार मानले. यावेळी शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande