
नवी दिल्ली , 12 मार्च (हिं.स.)। पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि समुद्री सुरक्षेच्या मुद्द्यावर भारत आणि इराण यांच्यात कूटनीतिक स्तरावर चर्चा सुरू आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, अलीकडच्या काही दिवसांत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री यांच्यात तीन वेळा चर्चा झाली आहे.
जायसवाल यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांमधील अलीकडील चर्चेत समुद्री जहाजवाहतुकीची सुरक्षा तसेच भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर विचारविनिमय झाला. मात्र, या चर्चेचे निष्कर्ष किंवा संभाव्य निर्णयांविषयी अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार देत, याबाबत आत्ताच अधिक बोलणे घाईचे ठरेल असे स्पष्ट केले.
इराणमधील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या परतीसाठी भारत सरकार सक्रियपणे मदत करत आहे. जायसवाल यांनी सांगितले की, सध्या इराणमध्ये सुमारे ९,००० भारतीय नागरिक आहेत. यामध्ये विद्यार्थी, नाविक, व्यावसायिक, उद्योजक, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच काही तीर्थयात्री यांचा समावेश आहे.त्यांनी सांगितले की, विशेषतः अनेक विद्यार्थी आधीच इराणमधून बाहेर पडून आपल्या घरी परतले आहेत. तसेच तेहरानमध्ये राहणाऱ्या अनेक भारतीयांना — ज्यामध्ये विद्यार्थी आणि तीर्थयात्रींचा समावेश आहे — खबरदारीचा उपाय म्हणून इराणमधील इतर सुरक्षित शहरांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
जायसवाल यांनी पुढे सांगितले की, जे भारतीय नागरिक इराण सोडून परतू इच्छितात, त्यांना अझरबैजान आणि आर्मेनिया मार्गे बाहेर पडण्यासाठी मदत केली जात आहे. यासाठी भारतीय दूतावास त्यांच्या व्हिसा प्रक्रियेत सहाय्य करत असून स्थलसीमा (लँड बॉर्डर) पार करण्यासाठीही मदत पुरवली जात आहे.
त्यांनी सांगितले की, अनेक भारतीय नागरिकांनी दूतावासाशी संपर्क साधला असून त्यांना अझरबैजान आणि आर्मेनिया सीमेपार जाण्यास मदत करण्यात आली आहे. त्यानंतर तेथून व्यावसायिक विमानसेवांद्वारे ते भारतात परतत आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने इराणमध्ये असलेल्या आणि स्थलसीमा मार्गे देश सोडण्याची इच्छा असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना भारतीय दूतावासाने जारी केलेल्या सूचनांचे (अॅडव्हायजरी) पालन करण्याचे आणि त्यानुसारच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode