
लातूर, 12 मार्च, (हिं.स.)। लातूर शहर व जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून धांगडधिंगा करणाऱ्या तसेच सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध लातूर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून नागरिकांना त्रास देणाऱ्या तसेच कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, लातूर तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांकडून संयुक्तरित्या विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून दररोज संध्याकाळच्या वेळेस शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, चौक, मोकळी मैदाने तसेच अंधाराचा फायदा घेऊन मद्यपान करणाऱ्या व्यक्तींच्या ठिकाणी अचानक धाड टाकून त्यांची धरपकड करण्यात येत आहे. अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करताना आढळून आलेल्या व्यक्तींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात कायद्यानुसार खटले दाखल करून प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.
या विशेष मोहिमेअंतर्गत तीन दिवसांपूर्वीच सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणाऱ्या ५९ व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून गेल्या दोन दिवसांत आणखी ४६ मद्यपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. लातूर पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून नागरिकांना त्रास देणाऱ्या व्यक्तींवर प्रभावी आळा बसण्यास मदत होत आहे.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून धांगडधिंगा करणे, रस्त्यावर गोंधळ घालणे किंवा इतर नागरिकांना त्रास देणे हे कायद्याने दंडनीय त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
लातूर जिल्ह्यातील नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे टाळावे, कायद्याचे पालन करावे व शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन लातूर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या प्रतिबंधक कारवाया पुढील काळातही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis