लातूर : शाळांनी शैक्षणिक साहित्य विक्री थांबवण्याची व्यापारी महासंघाची मागणी
लातूर, 12 मार्च, (हिं.स.) लातूर विभागातील काही शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांना जबरदस्तीने वही, पुस्तके, दप्तर, बूट-चप्पल आदी शैक्षणिक साहित्याची विक्री केली जात असल्याचा आरोप करत याबाबत तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी लातूर व्यापारी
शालेय साहित्य


लातूर, 12 मार्च, (हिं.स.) लातूर विभागातील काही शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांना जबरदस्तीने वही, पुस्तके, दप्तर, बूट-चप्पल आदी शैक्षणिक साहित्याची विक्री केली जात असल्याचा आरोप करत याबाबत तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी लातूर व्यापारी महासंघाने केली आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक, लातूर यांना निवेदन देण्यात आले आहे.

लातूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी व सचिव मनीष बंडेवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लातूर विभागातील अनेक शाळांमध्ये इयत्ता पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या परिसरातच वही, पुस्तके, दप्तर, बूट-चप्पल आदी साहित्याची विक्री केली जात आहे. यासाठी पालकांकडून थेट रोख रक्कम घेतली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

व्यापारी वर्ग शासनाला व्यवसाय कर, वस्तू व सेवा कर, आयकर तसेच महापालिकेचे विविध कर भरून व्यवसाय करीत असताना काही शैक्षणिक संस्था मात्र कोणताही कर न भरता साहित्य विक्री करीत असल्याचा आरोप महासंघाने केला आहे. अनेक संस्थांकडे वस्तू व सेवा कर नोंदणी क्रमांकही उपलब्ध नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.

शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित असताना काही ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून साहित्य विक्रीचे दुकान चालविले जात असल्याचेही महासंघाने नमूद केले आहे. त्यामुळे अशा प्रकारे शाळांमध्ये सुरू असलेली शैक्षणिक साहित्याची विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत शिक्षण विभागाने त्वरित कारवाई करून संबंधित संस्थांना सूचना द्याव्यात. अन्यथा लातूर व्यापारी महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande