
नंदुरबार, 12 मार्च, (हिं.स.) महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सन 2025-26 अंतर्गत जिल्ह्यासाठी तेलघाणा युनिटचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी 31 मार्च, 2026 पूर्वी कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
या अभियानांतर्गत काढणीपश्चात पायाभूत सुविधांसाठी तेल काढणी युनिट (10 टन क्षमता) उभारता येणार आहे. यामध्ये तेलबियावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, उपकरणे आणि प्रमुख व दुय्यम तेलबिया युनिट्सचा समावेश आहे. यासाठी प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल 9 लाख 90 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान म्हणून देय राहील. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी 31 मार्च 2026 पूर्वी संबंधित तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. या योजनेचा लाभ ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर दिला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. किरवे यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर