
तेहरान, 03 मार्च (हिं.स.)।अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यांमुळे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी इराणमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या (युएसजीएस) माहितीनुसार, दक्षिण इराणमधील गेराश परिसरात 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होता. काही अहवालांमध्ये तीव्रता 4.5 असल्याचे म्हटले असले तरी युएसजीएस च्या अधिकृत माहितीनुसार ती 4.3 इतकीच होती.
फारस प्रांतात हे धक्के जाणवले असून युद्धामुळे आधीच तणावाखाली असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोट आणि बॉम्बहल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भूकंप झाल्याने अनेक नागरिक घराबाहेर धावले, तर काहींनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केले. सध्या तरी कोणतीही मोठी जीवितहानी, मृत्यू किंवा जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
युएसजीएसने स्पष्ट केले की हा परिसर भूकंपप्रवण (सेस्मिक अॅक्टिव्ह) क्षेत्रात येतो, त्यामुळे हा नैसर्गिक टेक्टॉनिक हालचालींमुळे झालेला भूकंप असल्याची शक्यता आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हा इराणचा अणुचाचणी स्फोट तर नाही ना, अशा अफवा पसरत आहेत, कारण युद्धादरम्यान इराणच्या अणुस्थळांवर हल्ले होत आहेत. मात्र तज्ज्ञ आणि युएसजीएस यांनी स्पष्ट केले की 4.3 तीव्रतेचा भूकंप अणुचाचणीसारखा नसतो; अशा चाचण्यांमध्ये सामान्यतः अधिक तीव्रता आणि वेगळा भूकंपीय नमुना दिसून येतो. हा भाग भूकंपांसाठी ओळखला जातो आणि येथे दरवर्षी लहान-मोठे धक्के जाणवत असतात.
ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा तेहरानमध्ये अमेरिका-इस्त्रायलचे हवाई हल्ले सुरू आहेत. इराणने होर्मुज प सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली असून आखाती देशांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. संघर्षातील मृतांचा आकडा 1200 च्या पुढे गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 150 डॉलर्सपेक्षा जास्त झाल्या आहेत. सध्या मोठे नुकसान दिसून आले नसले तरी युद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांचा एकत्रित परिणाम परिस्थिती अधिक गंभीर करू शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode