
काबुल , 03 मार्च (हिं.स.)।अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील ड्युरंड लाईन सीमेवर गेल्या पाच दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. दरम्यान, पाकिस्तानी वायुसेनेच्या हवाई हल्ल्यांना अफगाण सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांवर प्रतिहल्ले केले आहेत.या कारवाईत अफगाण सैनिकांनी आतापर्यंत १०० हून अधिक पाकिस्तानी नागरिकांना ठार केले असून २५ पेक्षा अधिक लष्करी चौक्यांवर अफगाण ध्वज फडकवण्यात आला आहे.
अफगाण संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सैन्याने सुमारे २,६०० किलोमीटर लांबीच्या सीमेजवळील पाकिस्तानच्या अनेक महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले. या कारवाईत काबुललगतचे भाग, खोस्त प्रांतातील अली-शेर जिल्हा, जलालाबाद आणि कंधारमधील सीमावर्ती क्षेत्रांचा समावेश आहे.
अफगाण अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कंधार प्रांतातील स्पिन बोल्डक आणि शोराबक जिल्ह्यांमधील पाकिस्तानच्या अनेक लष्करी चौक्या अफगाण सैन्याने ताब्यात घेतल्या आहेत. स्पिन बोल्डकमधील तीन चौक्यांवर नियंत्रण मिळवताना तीन पाकिस्तानी सैनिक ठार झाले, तर एका सैनिकाला अफगाण सैन्याने ताब्यात घेतले. तसेच, अफगाणिस्तानातील मीडिया रिपोर्टनुसार, अली-शेर जिल्ह्यातील दोन पाकिस्तानी पोस्टही आता अफगाण सैन्याच्या ताब्यात आहेत.
दोन्ही देशांमधील तणाव तेव्हा अधिक वाढला, जेव्हा पाकिस्तानने २१–२२ फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तानातील कथित दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाण सैन्याने आक्रमक भूमिका घेतली.गेल्या चार दिवसांपासून दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांच्या ठिकाणांवर जोरदार गोळीबार करत आहे. अधिकाऱ्यांच्या मते, संघर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्याच्या तुलनेत सध्या लढाईची तीव्रता काहीशी कमी झाली असली तरी धोका अद्याप कायम आहे.हा संघर्ष मागील महिन्यात सुरू झाला, जेव्हा पाकिस्तानने अफगाण सीमेत घुसून दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचा दावा केला होता. त्यानंतर तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाण सैन्याने प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली.
सोमवारी अफगाण संरक्षण मंत्रालयाने आणखी एक मोठी घोषणा केली. पक्तिका प्रांतात अफगाण सैनिकांनी पाकिस्तानचा एक बख्तरबंद रणगाडा नष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. हा रणगाडा अफगाण भागावर अंधाधुंद गोळीबार करत होता. मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्लाह खोवाराजमी यांनी दावा केला की, आतापर्यंत अफगाण सैनिकांनी १०० हून अधिक पाकिस्तानी नागरिकांना ठार केले असून २५ पेक्षा अधिक लष्करी चौक्यांवर अफगाण ध्वज फडकवण्यात आला आहे.
अफगाण पोलिसांनी अशीही माहिती दिली की, पाकिस्तानी लढाऊ विमानांनी काबुलजवळील बगराम एअर बेसवर बॉम्बहल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अफगाण हवाई संरक्षण यंत्रणेने तत्परता दाखवत हा हल्ला हाणून पाडला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. बगराम एअर बेस पूर्वी अमेरिकन सैन्याचे सर्वात मोठे तळ होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode