
रायगड, 03 मार्च (हिं.स.)। कर्जत पोलीस ठाणे हद्दीत सोशल मीडियावर जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे सुरू झालेला वाद थेट आरोपींच्या घरी जाऊन जाब विचारण्यापर्यंत पोहोचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे कडाव, बौद्धनगर, ता. कर्जत येथे ही घटना घडली. फिर्यादी हे इन्स्टाग्राम अकाउंटवर रिल्स पाहत असताना आरोपी क्रमांक १ याने आपल्या अकाउंटवरून जातिवाचक शिवीगाळ करत आक्षेपार्ह कमेंट पाठविल्याचा आरोप आहे.
सदर कमेंटबाबत जाब विचारण्यासाठी फिर्यादी आरोपींच्या घरी गेले असता आरोपी क्रमांक याने “पोस्ट मीच टाकली असून तुम्ही आमच्या देवदेवतांबद्दल वाईट बोललात,” असे सांगितले. त्यानंतर दुसरा आरोपी यानेही फिर्यादीस शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुरनं. ११२/२०२६ अन्वये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ कलम ३(१)(u)(v) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९९, ३५१(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास खालापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल मेहुल करीत आहेत. सोशल मीडियावरील वादातून कायदेशीर गुन्हे घडू शकतात, याची जाणीव ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके