संरक्षण मंत्रालयाने एएलएच एमके III (एमआर) आणि व्हीएल श्तिल क्षेपणास्त्रांसाठी 5,083 कोटी रुपयांचे केले करार
नवी दिल्ली, 03 मार्च, (हिं.स.)। संरक्षण मंत्रालयाने 03 मार्च 2026 रोजी भारतीय तटरक्षक दलासाठी सहा प्रगत हलक्या वजनाची हेलिकॉप्टर (एएलएच) एमके III (सागरी उपयोग) आणि भारतीय नौदलासाठी जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या व्हर्टिकल लाँच - श्तिल क्षेपणास्त्रां
Defence Ministry signs deal


नवी दिल्ली, 03 मार्च, (हिं.स.)। संरक्षण मंत्रालयाने 03 मार्च 2026 रोजी भारतीय तटरक्षक दलासाठी सहा प्रगत हलक्या वजनाची हेलिकॉप्टर (एएलएच) एमके III (सागरी उपयोग) आणि भारतीय नौदलासाठी जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या व्हर्टिकल लाँच - श्तिल क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी एकूण 5,083 कोटी रुपयांचे करार केले. नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले.

एएलएच एमके III (एमआर )

ऑपरेशनल रोल इक्विपमेंट, अभियांत्रिकी साहाय्य पॅकेज आणि कामगिरी आधारित लॉजिस्टिक्स साहाय्यासह, हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, बेंगळुरू सोबत खरेदी (इंडियन–इंडिजिनसली डिझाइन्ड, डेव्हलप्ड अँड मॅन्युफॅक्चर्ड-स्वदेशी आरेखित, विकसित आणि निर्मित) श्रेणीअंतर्गत 2,901 कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे.

ही दुहेरी इंजिन असलेली हेलिकॉप्टर सध्या वापरात असलेल्या हवाई प्लॅटफॉर्मपेक्षा अधिक अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहेत. ती किनाऱ्यावरील हवाई तळांवरून तसेच समुद्रातील जहाजांवरून विविध प्रकारच्या सागरी सुरक्षा मोहिमा पार पाडण्यास सक्षम आहेत. या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे भारतीय तटरक्षक दलाची कृत्रिम बेटे, अपतटीय प्रतिष्ठापने यांचे संरक्षण, तसेच मच्छीमार आणि सागरी पर्यावरणाच्या सुरक्षेच्या जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल.

या प्रकल्पांतर्गत 200 हून अधिक सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांकडून उपकरणांचा पुरवठा संकल्पित असून, सुमारे 65 लाख मानव तास रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे. हा करार ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांप्रती सरकारच्या वचनबद्धतेला बळकटी देतो, तसेच देशाच्या सागरी सुरक्षा व्यवस्थेला आणखी बळकटी प्रदान करतो.

व्हर्टिकल लाँच - श्तिल क्षेपणास्त्रे

रशियाच्या जेएससी रोसोबोरोन एक्सपोर्टसोबत 2,182 कोटी रुपयांच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या व्हर्टिकल लाँच -श्तिल क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी करार करण्यात आला आहे. आघाडीच्या युद्धनौकांची विविध प्रकारच्या हवाई धोक्यांविरुद्धची हवाई संरक्षण क्षमता लक्षणीयरीत्या वाढवणे, हा याखरेदीमागचा हेतू आहे.

ही प्रणाली भारतीय नौदलाच्या विविध प्लॅटफॉर्मवरील स्तरित हवाई संरक्षण संरचनेला अधिक बळकटी देईल. ती जलद प्रतिसाद क्षमता, सर्व हवामानात कार्य करण्याची क्षमता पुरवेल, तसेच आव्हानात्मक सागरी वातावरणात टिकून राहण्याची क्षमताही उंचावेल. हा करार भारत आणि रशिया यांच्यातील परस्पर विश्वास आणि धोरणात्मक समन्वयावर आधारित दीर्घकालीन व काळाच्या कसोटीवर उतरलेल्या संरक्षण भागीदारीला अधोरेखित करतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande